पालघर: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांमध्ये काटकता व मेहनत करण्याची तयारी असून त्याला पौष्टिक आहार व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अशा होतकरू खेळाडूंच्या माध्यमातून २०३६ ऑलिम्पिक मिशनची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पालघर मध्ये सांसद खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सव्वा सहा लाख पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग होणे अपेक्षित असून जिल्ह्यातील खेळाडूं दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
२ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान पालघरच्या म. नी. दांडेकर हायस्कूल मैदान (संघटनात्मक खेळ), कोळगावचे पोलीस मैदान (अथलेटिक स्पर्धा), जिल्हा क्रीडा संकुल (बॅडमिंटन स्पर्धा) व लायन्स क्लब हॉल (योगा स्पर्धा) याठिकाणी आयोजन करण्यात येणार असून बहुतांश स्पर्धा या १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील मुलं व मुली तसेच खुल्या गटाकरीता आयोजित केल्या जाणार आहेत.
या महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लंगडी, वैयक्तिक मैदानी स्पर्धा, मॅरेथॉन, बॅडमिंटन, योगा अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून या प्रत्येक खेळात वयोगटांमध्ये विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, वसई व पालघर या आठही तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, खाजगी शाळा, कनिष्ठ विद्यालय यामधील विद्यार्थ्यांना या महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेता येणार असून सुमारे सव्वा सहा लाख खेळाडूंनी आजवर त्यामध्ये नोंदणी केली आहे. स्पर्धा सुरू होईपर्यंत खेळाडूंना त्यांची नोंदणी करणे शक्य राहणार असल्याची माहिती पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकारांना दिली. देशातील खासदारांमार्फत विविध ठिकाणी अशाच प्रकारच्या स्पर्धा होत असून पालघर मधील स्पर्धकांचा नोंदवण्यात आलेला सहभाग हा राष्ट्रीय पातळीवर एक विक्रम असल्याचे सांगत पालघरसाठी या स्पर्धा ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी दानशूर व्यक्ती, उद्योग समूह तसेच उद्योगांच्या सामाजिक दायित्व फंडातून उभारला जाणार असून या स्पर्धांच्या आयोजनासाठी १५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच खेळाडूंसाठी आरोग्य व्यवस्था केली जाणार असून दूरवरून येणाऱ्या खेळाडूंसाठी वाहतूक व्यवस्था व आवश्यकता भासल्यास निवासाची व्यवस्था केली जात असल्याची माहिती खासदार यांनी यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२०३६ च्या ऑलम्पिक करिता यजमानपद मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत असताना विविध खेळांमधील स्पर्धकांचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानीय पातळीवर खेलो ग्राम योजना व इतर स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याखेरीज वेगवेगळ्या प्रशिक्षकांना विकसित केले जात असून ग्रामीण भागातील क्रीडा गुण असणाऱ्या युवकाला वाव मिळण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले जात असून व्यावसायिक खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने या व इतर स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या खेळ महोत्सवात सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन खासदार डॉ. सवरा यांनी केले.
या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील आमदार व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यामार्फत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहित केले जाणार आहे. या स्पर्धेच्या समारोपय समारंभाला पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
सांसद खेळ महोत्सवाचे वेळापत्रक
२ नोव्हेंबर : मॅरेथॉन, व्हॉलीबॉल (खुला गट), योग व लंगडी स्पर्धा
३ नोव्हेंबर : व्हॉलीबॉल शालेय गट, खो-खो खुला गट
४ नोव्हेंबर : बॅडमिंटन स्पर्धा (सर्व वयोगट), खो-खो (शालेय गट)
५ नोव्हेंबर : कबड्डी शालेय गट
६ नोव्हेंबर : कबड्डी खुलागट, वैयक्तिक मैदानी स्पर्धा (सर्व गट)
(पत्रकार परिषदे दरम्यानचे छायाचित्र)
