पालघर : पालघर जिल्ह्यात विविध वनक्षेत्रात हंगामी पद्धतीने काम करणाऱ्या ७४० वन कर्मचाऱ्यांना गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून कामाचा मोबदला दिला जात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. वन क्षेत्रामध्ये हे वनमजूर जंगलाचे रक्षण करतात. यापैकी अनेक मजूर २०-२५ वर्षांपासून काम करत आहेत. या वन मजुरांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कायम स्वरूपात नोकरीत सामावून घ्यावे, त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, नियमित पगार व सलग काम देण्यात यावे, त्यांचा विमा काढण्यात यावा. कायम कामगारांप्रमाणे सवलती मिळाव्या, त्यांना लागवडीपश्चात काम देण्यात यावा, रात्रीच्या संरक्षणासाठी गमबूट, टॉर्च व इतर साहित्य देण्यात यावे आदी मागण्या प्रलंबित आहेत. याविषयी वन विभागाशी संपर्क साधला असता वनमजुरांच्या वेतनासाठी वेगवेगळय़ा लेखाशीर्षकांतर्गत निधी येत असून राज्यस्तरावरील तसेच जिल्हा नियोजन स्तरावरून या कर्मचाऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला न झाल्याने त्यांचा पगार प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात येते.