डहाणू : डहाणू प्रांत कार्यालय तसेच तलासरी तहसीलदार कार्यालयावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने विश्वासघात मोर्चा काढला होता. डहाणू सागर नाका ते डहाणू प्रांत आणि माकपच्या तलासरी कार्यालयाकडून निघालेला मोर्चा तलासरी चौक ते बाजारपेठ आणि त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. मार्क्‍सवादी, जनवादी महिला संघटना, किसान सभा, डीवायएफवाय संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते.

मीटर रीिडगवरच बिल द्यावे, घरकुलातील डह्ण यादीतील अटी शिथिल कराव्या,  शबरी आवास योजनेचा सर्वाना लाभ द्यावा, कसत असलेल्या वरकस जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्या,  घर तेथे शौचालयह्ण या योजनेचा लाभ सर्वाना द्यावा.  द्रुतगती (एक्सप्रेस वे ) बुलेट ट्रेन मार्गाचा मोबदला कब्जेदारांना शंभर टक्के हक्काने मिळावा, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, संयुक्त कुटुंबातील पिवळे रेशनकार्ड विभक्त करून प्रत्येक कुटुंबाला पिवळे रेशनकार्डचा लाभ द्यावा, पेशा निधीचा वापर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योग्य प्रकारे व्हावा, आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात पेशाअंतर्गत नोकरभरती करावी, वनपट्टेधारकांना वनपट्टय़ाचे वन विभागामार्फत जीपीएस व गुगल अ‍ॅपद्वारे लवकरात लवकर मोजणी करून द्यावे. आदी मागण्यांचे निवेदन तलासरी तहसीलदार श्रीधर गालीपेले यांना देण्यात आले. या मोर्चात आमदार विनोद निकोले, चंद्रकांत गोरखाना,  जिल्हा सेक्रेटरी कॉ. बारक्या मांगात, कॉ.  पागी, कॉ.  डोंभरे, कॉ.  हाडळ, कॉ.  भोये,  डावरे, कॉ.  गोवारी, सुनीता शिंगाडे, जिल्हा कमिटी सदस्य आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.