पालघर : सफाळे परिसरामध्ये अनेक गावे येत असली तरी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून आहे. येथील रुग्णांची फरपट लक्षात घेता सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, सुजाण नागरिक तसेच इतर नागरिकांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या सफाळे परिसर संघर्ष समितीने रुग्णालयासाठी एल्गार पुकारला आहे. सुसज्ज रुग्णालयासंदर्भात योग्य ती पावले न उचलल्यास २५ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन समितीमार्फत करण्यात येणार आहे.
भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने सफाळे पूर्व-पश्चिम परिसर मोठा आहे. त्यापैकी सफाळे- उंबरपाडा हे ४५ ते ५० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून मुख्य बाजारपेठ आहे. सफाळे येथे मध्यवर्ती व मोठी बाजारपेठ नागरिकांसाठी आहे. सुमारे ४५ गावे या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. या गावांमध्ये आरोग्य सुविधांची वानवा दिसून येत आहे. आरोग्य सुविधांअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात असले तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता तेथील आरोग्य सुविधा अलीकडील काळात अपुरी पडू लागली आहे. या भागातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक या रुग्णालयावरच अवलंबून आहेत. काही वेळेस गरोदर स्त्रियांना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून पालघर येथे फरपट करावी लागते. त्यामुळे या परिसरात नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सुसज्ज असे रुग्णालय मिळण्याबाबत परिसर संघर्ष समिती गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन दाद देत नसल्यामुळे समितीने आंदोलनाचा पर्याय निवडला आहे व तसा इशाराही जिल्हा प्रशासनाला दिला.