३१ जानेवारीपर्यंत सर्व आश्रमशाळा बंद ठेवण्याचा निर्णय
वाडा : वाडा तालुक्यातील पाली येथील शासकीय आश्रमशाळेतील १४ विद्यार्थाचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली असून जव्हार विभागातील सर्व आश्रमशाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय विभागाच्या ३० आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळेत १७ हजार ३०० निवासी तर पाच हजार २०० बाह्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच प्रकल्पांतर्गत १८ अनुदानित आश्रमशाळा असून यामध्ये ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाडा तालुक्यातील मौजे पाली येथील आश्रमशाळेत एकूण ६५० विद्यार्थी आहेत. त्यातील १४ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्याते आठ मुली तर सहा मुलांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे तालुक्यातील शाळांनी चिंता व्यक्तकेली आहे.
एकाच आश्रमशाळेत करोना चाचण्या
आश्रमशाळा सुरू झाल्यापासून जव्हार प्रकल्पातील काही आश्रमशाळांमध्ये अनेक विद्यार्थी सर्दी, ताप, खोकला या आजाराने त्रस्त होते. असे असतानाही केवळ पाली येथील शाळेतील विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत १४ विद्यार्थ्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.
लसीकरणापासून वंचित
१५ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे. जव्हार प्रकल्पात ११ वी व १२ वी चे वर्ग असलेल्या आठ आश्रमशाळा आहेत. या वर्गात दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ९० टक्के विद्यार्थी कोविड लसीकरणापासुन आजही वंचित आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपर्यंत सर्व आश्रमशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र १० वी, १२ वी चे वर्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत.
-आयुषी सिंह, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर.