बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल या कारखान्यात झालेल्या अपघातात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात मागील काही दिवसांपासून अपघाती घटनांचे सत्र सुरू आहे. विराज प्रोफाइल या पोलाद कारखान्यात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात परेश रमेश राठोड, (३४) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बोईसर येथील वरद रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. परेश राठोड हा कामगार डहाणू आगर येथील राहणारा असून त्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
विराज प्रोफाइल या पोलाद कारखान्यात वारंवार अपघाती घटना घडत असून यापूर्वी नऊ ऑक्टोंबर रोजी झालेल्या अपघातात तीन कामगार जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी कारखाना व्यवस्थापनावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने विराज प्रोफाइल कारखान्याला भेट देऊन केलेल्या पाहणीत सुरक्षा उपाययोजनांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी कारखान्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
महिनाभरात पाच अपघात
तारापूर औद्योगिक क्षेत्रात महिनाभरात पाच अपघात घडले असून यामध्ये पाच कामगारांचा मृत्यू तर चार कामगार जखमी झाले आहेत. तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आकडेवारीनुसार पाच वर्षात ९६ औद्योगिक अपघात झाले असून यामध्ये ५३ कामगारांचा बळी गेला असून १०० पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवणारे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनाचे दुर्लक्ष यामुळे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होऊन त्यामध्ये निष्पाप कामगारांचा बळी जात असल्याचा आरोप होत आहे.
