कासा: आजच्या आधुनिक युगात डीजे संगीताने विवाह, सण आणि विविध कार्यक्रमांमध्ये आपले स्थान टिकवून आहे. मोठ्या मोठ्या स्पीकर्सवर वाजणारे गाणी आणि तेजस्वी लाईट्सने पारंपरिक वाद्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरीही अनेक गावांमध्ये अजूनही पारंपरिक वाद्यांचा उत्साह कायम आहे.
कोणताही उत्सव अथवा घरगुती कार्यक्रम असल्यास मोठमोठ्याने वाजणारी गाणी बॅन्जो व डीजेला आधुनिक युगात मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक जुनी वाद्य संस्कृती व कला लोप पावत जात असलेली दिसून येतात. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये काही वेगळे चित्र असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये, लग्नसराईत, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्यवृंदाने रंगतदार सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
डीजे व बॅन्जो व्यतिरिक्त ढोल, ताशा, आणि शेहनाई यांचे सूर वातावरणात गूंजताना दिसत आहेत. पारंपरिक वेषभूषा केलेले कलाकार, पारंपरिक नृत्य आणि ढोलाच्या तालावर नाचणारे नागरिक हे दृश्य डीजेच्या आधुनिकतेला आव्हान देतात. डीजे वाजवणे सोपे आहे पण पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी कौशल्य, मेहनत आणि समर्पण लागते. आधुनिकतेच्या स्पर्धेतही पारंपरिक वाद्यांचा बाज कायम आहे. ती केवळ कला नसून आपल्या संस्कृतीचा भाग आहे, जी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे.
आधुनिकतेसोबतच लोक पारंपरिक गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे, पारंपरिक वाद्ये, कपडे आणि दागिने यांना विशेष पसंती मिळत आहे. डिजिटल साउंड सिस्टीम आणि डिजेच्या तुलनेत, पारंपरिक वाद्य कमी खर्चिक आणि पारंपरिक असल्यामुळे तसेच ही वाद्ये पारंपरिक संस्कृती आणि लग्नाच्या सोहळ्याला एक खास रंगत देतात. डिजिटल साउंड सिस्टीमवर निर्बंध आल्यामुळे पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे, ज्यामुळे वाजंत्री मंडळींना चांगले दिवस येत आहेत.
वाजंत्री मंडळींचे अच्छे दिन
लग्न समारंभात आता पूर्वीप्रमाणेच सनई, ताशा, संबळ, हलगी, डफ तसेच बँड, बँजो अशा पारंपरिक वाद्यांचा सूर कानी ऐकू येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक वाजंत्रींची मागणी वाढत असल्याचे दिसून येते. पारंपरिक वाजंत्री मंडळींना लग्नसराई दरम्यान रोजगार उपलब्ध होत आहे. अलीकडच्या काळात वाजंत्री कलाकारांना चांगले पैसे मिळत आहेत. वाजंत्री कलाकारांच्या एका ताफ्यात सहा ते सात वाजंत्री कलाकार असतात.
ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या
लग्न समारंभात मोठ मोठ्याने वाजणाऱ्या साऊंड मुळे हृदयविकार, मानसिक त्रास यासह इतर आजारांनी ग्रस्त, ज्येष्ठ मंडळी यांना या मोठमोठ्याल्या भोंग्यांच्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयावर ताण येणे, हार्ट अटॅक येणे किंवा स्ट्रोकसारखे त्रास होऊ शकतात. तसेच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.