scorecardresearch

वृक्ष प्राधिकरणाकडून केवळ वृक्षतोडीची परवानगी; समिती विकासकांसाठी असल्याचा आरोप

पालघर नगरपरिषदेची वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाली असली समितीच्या बैठकीत विविध विकासकांच्या विकास हद्दीतील झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याशिवाय इतर कामे केल्याचे दिसत नाही.

पालघर: पालघर नगरपरिषदेची वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाली असली समितीच्या बैठकीत विविध विकासकांच्या विकास हद्दीतील झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याशिवाय इतर कामे केल्याचे दिसत नाही. त्यामुळे ही समिती विकासकांसाठी स्थापन केली आहे की काय? असा आरोप होत आहे.
पालघर नगर परिषद घरपट्टीद्वारे वृक्षकराच्या नावाखाली प्रचंड कर वसूल करत आहे. मात्र प्रत्यक्षात खर्चच होत नसल्याचे दिसून येते. वृक्ष मोजणी व नोंदणी, त्यांना ओळख क्रमांक देणे, झाडाची नावे, त्याचे वय, झाडांचे वर्गीकरण व प्रकार अशा पाटय़ा लावणे, नव्याने वृक्षारोपण करणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करणे अशी कामे झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. पालघर नगर परिषद हद्दीमध्ये झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. नवनवीन गृहसंकुले, इमारती उभी राहात आहेत. ही गृहसंकुले उभी राहात असताना व त्यांना परवानगी देताना नगर परिषदेने वृक्षारोपण करण्याच्या अटी-शर्ती बंधनकारक केलेल्या आहेत. विकासक वृक्षरोपणाचा निधी नगर परिषदेकडे जमा करतात. मात्र या निधीतून प्रत्यक्षात वृक्षारोपण केले जात आहे किंवा नाही हे गुलदस्त्यातच आहे. जे वृक्षारोपण केले जात आहे त्या वृक्षांचे संवर्धन केले जात नाही, असे सांगितले जाते. दरवर्षी पालघर नगर परिषद वृक्ष कराच्या नावाखाली प्रत्येक घरपट्टी अंतर्गत करदात्यांकडून पंधरा रुपये कर आकारणी करते असे लाखो रुपये दरवर्षी वृक्ष कर लेखाशीर्ष खाली जमा होत आहे. मात्र प्रत्यक्षात हा पैसा खर्च होतो का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत प्रभारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याशी संपर्क केला असता एका कामाच्या भेटीकरिता आलो असून या विषयावर नंतर बोलतो असे सांगितले.
समितीची उदासीनता
झाडांशी संबंधित इत्यंभूत माहिती गोळा करून त्यांचे संकलन करणे, हे समितीचे काम आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा झाडांचे महत्त्व पटवून देणे, वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संवर्धन याचबरोबरीने बांधकाम परवानगी देताना विकासक नियमानुसार वृक्षारोपण करत आहे की नाही याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.

पालघर नगर परिषदेत बोगस कारभार सुरू आहे. जनविकासाची कामे सोडून सर्व जण स्वार्थ साधण्यात मग्न आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीची डळमळीत अवस्था आहे. ती फक्त विकासकांसाठी मर्यादित आहे. नगर परिषदेवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.-सचिन पाटील, माजी नगरसेवक,पालघर नगरपरिषद

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tree felling permission authority alleged committee developers tree authority committee palghar municipal council amy