|| निखिल मेस्त्री

स्थलांतर थांबवण्यात प्रशासन अपयशी

पालघर : कुपोषण, बालमृत्यू पाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून रोजगारासाठी स्थलांतर होणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे.  स्थलांतर झालेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील दोन मुलींचा अलीकडेच मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीचा विंचूदंशाने तर दुसरीचा तापामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अतिदुर्गम भागात रोजगाराची संसाधने उपलब्ध नसल्यामुळे मोखाडा जव्हार विक्रमगड या भागातील बहुतांश आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पालघर अशा मोठ्या शहरांकडे वळताना दिसत आहे. दोन मुली मृत्यू झाल्याची  मोखाडा तालुक्यातील कुटुंबांची असून  स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ग्रामीण भागातील काही लोकप्रतिनिधी याच बरोबरीने प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे असे बळी जात असल्याचे आरोप होत आहेत.

 ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचे होत असलेल्या स्थलांतरावरून दिसून येते शासनाच्या अनेक रोजगाराभिमुख योजना येत असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागांमध्ये होत नसल्याने रोजगाराअभावी ही कुटुंबे मोठ्या शहरांकडे पोटाची खळगी भरण्यासाठी वळत आहेत ज्या ठिकाणी ते स्थलांतरित होत आहेत. त्या ठिकाणी असुरक्षित पद्धतीने ते राहात आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे.

जव्हार तालुक्यातील नांदगाव या परिसरातील एक कुटुंब रोजगारासाठी अहमदनगर येथे स्थलांतरीच झाले होते या कुटुंबातील मोनाली सण्या बरफ या १३ वर्षीय आदिवासी कातकरी मुलीचा अहमदनगर  येथे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

हे कुटुंब कापशी तालुक्यात खडी फोडण्याचे काम करीत असताना मोनाली बंधाऱ्यावर आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेली असता पाय घसरून पाण्यात पडून तिचा मृत्यू झाला ही मुलगी इयत्ता सहावीत शिकत होती. तर दुसऱ्या घटनेत मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मजुरीसाठी स्थलांतर झालेल्या लहू भगरे यांची साडेतीन वर्षाची मुलगी अनुष्का हिचा तापामुळे मृत्यू झाला वारघडपाडा येथील हे भगरे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी भिवंडी, पडघा येथे गेले होते. तिथे अनुष्का हिला ताप आला. तिला पडघा येथे दवाखान्यात दाखल केले. तेथून भिवंडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र तिचे निधन झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या भगरे कुटुंबावर काळाने घाव घातला. रोजगारासाठी स्थलांतर केलेल्या या दोन्ही कुटुंबांवर काळाने घाला घातला असून घडलेल्या घटना दु:खद असल्या तरी स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याचे या दोन्ही घटनांवरून समोर येत आहे.

या दोन्ही प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू आहे.अहवाल आल्यानंतरच नेमके कारण समजेल.

-डॉ.मिलिंद चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

जिल्ह्यातील स्थलांतर एक भयानक समस्या आहे. घडलेल्या घटना खेदजनक व दु:खद आहेत.पालघर जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून कुटुंबाला मदत मिळावी असे लेखी पत्र दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. -प्रदीप वाघ, माजी सभापती, पंचायत समिती, मोखाडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कातकरी कुटुंबाचे स्थलांतर थांबावे अशी मागणी आहे. कुटुंबीयांची सांत्वनभेट घेऊन चर्चा केली. -अंकुश वड,सहसचिव, आदिवासी कातकरी संघटना