वाडा:  वाडा तालुक्यातील मौजे बिलोशी येथील महिंद्रा रोझीन या रासायनिक कंपनीत दोन आदिवासी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

महिंद्रा रोझीन कंपनीत   दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे  सचिन बाळकृष्ण भोईर (३२)  रा. बिलोशी हा येथील भट्टीमध्ये (रिअ‍ॅक्टर) साफसफाई करण्यासाठी उतरला होता, परंतु बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून  किशोर यशवंत करले (२७) रा. गोऱ्हे हादेखील भट्टीमध्ये उतरला. दोघेही बाहेर न आल्याने  पाहणी केली असता कामगारांचा विषारी रसायनाने गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसले.  वाडा पोलिसांनी  घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद केली असून  तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे करीत आहेत.

दरम्यान, तपासाअंती कारण समजेल. कंपनीत सर्व  सुरक्षा व्यवस्था  आहेत, अशी माहिती कंपनीचे सहव्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी दिली.

नातेवाईकांकडून संताप

घटना १० ते १२ तासांनी कामगारांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली.  कंपनी प्रशासनाने कुठलीही सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याचा आरोप करून व्यवस्थापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा आदिवासी संघटना व श्रमजीवी संघटनेने दिला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता.