दाभले ग्रामपंचायतीवरील प्रशासक बदलण्याची मागणी
डहाणू : वाणगावनजीकच्या दाभले ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाल्यापासून प्रशासकाची मनमानी सुरू झाली आहे, अशी ओरड गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाकडून होत आहे. कुपोषित मुलांचा पोषण आहार, अंगणवाडी, ग्राम आरोग्य पोषण आहार, आधार कार्ड दाखले, बेरोजगार झालेल्या कामगार कष्टकरी मजुरांना बांधकाम कार्यालयात नावनोंदणीसाठी लागणारे दाखले तसेच इतर खासगी कामासाठी लागणारे दाखले देण्यास प्रशासक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रशासक बदलून मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पालघर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
करोना महासाथीचा काळ असल्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरपंच नसल्याने विविध दाखले आणि योजनांचे धनादेश यावर प्रशासकाची सही लागते. मात्र दाभले ग्रामसेवक हनुमंत कांबळे हे लाभार्थ्यांना १५-१५ दिवस चकरा मारायला लावतात अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच गावातील मूलभूत समस्यांबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. या करोनाकाळातील कठीण प्रसंगामध्ये ग्रामपंचायतीवर नेमलेले प्रशासक तसेच वरिष्ठ अधिकारी गोरगरीब जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी कामगार व मजूर यांच्या मूलभूत प्रश्नांची दखल घेत आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते भरत वायडा यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले.
मला शेततळय़ाच्या दाखल्यासाठी दाभले ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी पंधरा दिवस अडवून ठेवले होते. मात्र शेवटी वाद घालून मला दाखला देण्यात आला. मात्र गोरगरीब नागरिकांना प्रशासकाच्या मनमानी कारभाराने वेठीस धरले आहे. प्रशासक बदलून मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
– भरत वायडा, कार्यकर्ते
मी पॉझिटिव्ह असल्याने ग्रामपंचायतीत येऊ शकलो नाही. अंगणवाडीला दुकानांच्या नावे धनादेश देणे बाकी आहे. मी आल्यानंतर ती सर्व कामे तडीस लावणार आहे.
– हनुमंत कांबळे, प्रशासक, दाभले ग्रामपंचायत