वाडा : वाडा तालुक्यातील जनावरांना पायांच्या खुरी (खुरकूत) ) रोगाच्या आजाराची लागण झाल्याने दुभती जनावरे त्याचबरोबर शेतीच्या कामाची जनावरे त्रस्त होऊ लागली असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनाबरोबरच शेतीच्या कामांवर होऊ लागला आहे. त्यामुळे पशुपालक मोठ्या चिंतेत आहेत. जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांनी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
वाडा तालुक्यातील मालोंडे, नेहरोली या परिसरात खुरी (खुरकूत) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नेहरोली गावात दुग्धव्यवसाय करीत असलेले पशुपालक पंढरीनाथ पाटील यांच्या १० दुधाळ म्हैशींपैकी चार दुधाळ म्हशी, व सहा पारडे यांना मागील १५ दिवसांपासून खुरी रोगाचा संसर्ग झाला आहे. एका म्हशी पासून दिवसाला ८ लीटर उत्पादन मिळत होते, मात्र आता ते पूर्णतः घटले आहे. गाभण म्हशी कशा बशा खाजगी पशुवैद्यकाकडून उपचार करून वाचविण्यात यश आले त्यांनी सांगितले.
तर त्याच गावातील दिगंबर केदार यांच्या जवळपास ५ ते ७ दुधाळ जनावरांनाही खुरी रोगाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मालोंडे येथील हरेश वेखंडे यांनी त्यांच्या दोन गायींना व एका म्हशीला खुरी रोगाचा संसर्ग सुरू झाला असल्याची माहिती दिली आहे. एकंदरीत परिसरात जनावरांना खुरी रोगाचा प्रादुर्भाव पसरल्याने दुग्धव्यवसायक पशुपालक मोठ्या चिंतेत आहेत.
वाडा तालुका पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत नेहरोली येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे गावात जनावरांच्या लसीकरणासाठी येत नसल्याची तक्रार पशुपालकांनी केली आहे. शिवाय आता जनावरांना खुरी रोगाची लागण झाल्याने खाजगी पशुवैद्यकांकडून उपचार करून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे पशुपालक पंढरीनाथ पाटील यांनी “लोकसत्ता”शी बोलताना सांगितले.
वाडा तालुक्यात पशुवैद्यकीय श्रेणी एक व दोनचे दवाखाने आहेत. मात्र आता श्रेणी दोन मध्ये देखील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. हे पशु अधिकारी तालुक्याबाहेर वास्तव्यास असल्याने अत्यावश्यक असल्यास रात्रीच्या वेळीस”पशुसेवा” मिळत नाही. मात्र दिवसा हेच अधिकारी उशीराने दवाखान्यात पोहचत आहेत. पशुपालकांनी उपचारांसाठी बोलावल्यास मीटिंगचे कारण पुढे करून अथवा आमच्याकडे पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन ते चार अतिरिक्त कार्यभार आल्याचे सांगून पशुपालकांना सेवा देण्यात टाळाटाळ करीत असल्याचे पशुपालकांकडून सांगितले जाते.
त्यामुळे वाडा तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णतः कोलमडून जात असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने अनेकदा खाजगी पशुवैद्यकाचा आधार घ्यावा किंवा पर्याय शोधावा लागत असल्याने तो खर्चिक ठरत आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत. मात्र सध्या पावसाच्या दमट वातावरणात जनावरांना मोठ्या प्रमाणात खुराच्या आजाराची लागण होऊ लागल्याने त्यांच्या पायाच्या खुरीमध्ये जखमा होत असुन जनावरे लंगडताना दिसून येत आहे. याचा थेट परिणाम दुग्ध व्यवसायावर पडत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक मोठा फटका बसत आहे.
पावसाळ्यात गोठ्यातील अस्वछता, ओलसरपणा, शिवाय हा खुरी हा आजार बहुधा विषाणू संसर्गजन्य असल्याने जनावरांना खुरांचे आजार जडतात. अनेकदा लाळ्या खुरकूत आजार निर्माण होऊ शकतो. मात्र या आजाराकडे दुर्लक्ष करणे जनावरांसाठी हानिकारक ठरू शकते.
या आजारांमुळे जनावरे खाणे पिणे सोडून देणे, दूध देण्याची क्षमता कमी होणे. प्रजनन क्षमता कमी होणे, काम करण्याची व प्रतिकार शक्ती घटते, गाभण जनावरांचा गर्भपात होतो. शेतीची कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जनावरांच्या आजाराकडे लक्ष देऊन त्यांचे लसीकरण व उपचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र अनेक गावांत पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम राबविली जात नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश येत आहे.
ज्या गावातील जनावरांना खुरी रोगाची लागण झाली आहे; त्या जनावरांचे आजाराचे निदान करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना पाठवून शहानिशा केली जाईल. व त्यावर योग्य उपचार केले जातील. – डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पालघर