वाडा : पावसाळ्यात वाडा ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश, विंचू दंशाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने त्याचा वाडा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण दिसून येत आहे. चालू वर्षात जून व जुलै या दीड महिन्यात जवळपास ८६ सर्पदंश, विंचू दंश व इतर दंशाचे रुग्ण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. १८ जुलैला एकाच दिवशी तीन रुग्ण सर्पदंशाचे दाखल झाले होते. त्यांच्यावर झालेल्या यशस्वी उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले.
मागील चार वर्षांपासून (२०२१) वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होवूनही हे रुग्णालय जागे अभावी रखडलेलेच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेले दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालय वेळीतच न झाल्यास शासनाचा पाच वर्षांसाठी असलेला शासन निर्णय (२०२६ मध्ये) आपोआप रद्द होईल अशी माहिती रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा निर्णय देखील रद्द होण्याची संभवना व्यक्त होत आहे. दरम्यान चार वर्षे उलटूनही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय जागेअभावी रखडलेलेच असल्याने पावसाळ्यात साथीचे आजार, सर्पदंश, विंचू दंश, विषबाधा, प्रसूती करिता झालेल्या अनेकदा रुग्णालयात रुग्णांना खाटा उपलब्ध न झाल्यास जमीनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वाडा तालुक्यात दुर्गम भाग असल्याने सर्पदंश, विंचू दंशाचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात चालू वर्षात जून व जुलै या दीड महिन्यात सर्पदंश, विंचू दंश व इतर दशांचे एकूण ८६ रुग्ण, साथीच्या आजारांचे ६७५ रुग्ण, प्रसूती करिता १३७ महिला उपचारांसाठी दाखल झाले होते. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या यशस्वी उपचारांमुळे व वेळीतच संदर्भीय केल्याने यांपैकी सर्प, विंचूदशांचा कुठलाच रुग्ण दगावले नसल्याची माहिती वाडा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.
अनेकदा सर्पदंश झालेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असले तरीही विषारी सर्पाने चावा घेवून गंभीर झालेल्या रुग्णास ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सोयी- सुविधांमुळे संदर्भन्वयीत करून सिव्हिल जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. सर्पदंश, विंचू दंश झालेल्या रुग्णांना वेळीतच उपचार न मिळाल्यास किंवा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास रुग्ण दगावण्याची अधिक शक्यता असते. सर्पदंशावरील “अँटी स्नेक व्हेनम” हे प्रभावी औषध (लस) असल्याने रुग्णांवरील उपचारांसाठी त्याचा मोठा फायदा होत आहे. सध्या या औषधाचा रुग्णालयात तुडवडा नसल्याने अनेक सर्पदंश झालेले रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
पालघर व ठाणे जिल्ह्यात २३ प्रकारचे सापांच्या प्रजाती आढळून येतात. यापैकी बिनविषारी, सौम्य विषारी आणि विषारी साप आढळून येत आहेत. यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजऱ्या, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी व धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीन, पाणदिवड, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. अशी माहिती विक्रमगड येथील सर्प मित्र पप्पु दिघे यांनी दिली.
पावसाळ्यात सापांचा प्रजनन काळ असतो, या काळात मादी आक्रमक असते, तसेच शेतात बिळात पाणी जात असल्याने साप बिळाबाहेर निघतात. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतावर जात असल्याने अशा वेळी सर्पदंश होत असतात.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुढाकार घेऊन जागेचा तिढा सोडविण्याची मागणी
वाडा, विक्रमगड, शहापूर या तालुक्यातून अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. दररोज बाह्यरुग्णांची संख्या ३५० ते ४०० च्या वर आहे. हा उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने बैठक घेऊन सोडवावा. अथवा थेट पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुढाकार घेवून जागेचा तिढा सोडविण्याची मागणी होत आहे.
वाडा एसटी आगारातील पाच एकर जागा मिळाल्यास सुसज्ज इमारत उभारता येईल. यासाठी एसटी महामंडळाला प्रस्ताव पाठविला आहे. तसेच अन्य एक-दोन जागेची पाहणी केली आहे. – डॉ. यादव शेखरे, वैद्यकीय अधिक्षक, वाडा ग्रामीण रुग्णालय वाडा
वाडा ग्रामीण रुग्णालयात जुन व जुलै महिन्यात दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी
जुन महिना २०२५ | रुग्णांची संख्या |
सर्पदंश | ४३ |
अतिसार, हगवण | १० |
प्रसुती | ८२ |
ताप (मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू) | ६४९ |
०१ जुलै ते १८ जुलै पर्यंतची आकडेवारी
जुलै २०२५ | रुग्णांची संख्या |
सर्पदंश | ४३ |
अतिसार, हगवण | १८ |
प्रसुती | ५५ |
ताप (मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू) | २६ |