|| नीरज राऊत

पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्यास साडेसात वर्षे झाली.अद्याप ग्रामीण भागातील ग्रामस्थांना  उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय असणे आवश्यक आहे.  परंतु ते अधांतरी असल्यामुळे तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या पालघर ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार आणि सुविधा पाहता त्यास  उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करावे, अशी मागणी पुन्हा पुढे येत आहे. 

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
nagpur district court new building marathi news,
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचाही वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा…
9 new department, cama hospital, start, benefits, patients, thane, new mumbai, raigad,
कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर पालघर शहरालगत जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून अजूनही या रुग्णालयाचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. पालघरमध्ये असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटांची सुविधा आहे.  पुरुष रुग्ण, महिला रुग्ण तसेच प्रसूती रुग्णांसाठी प्रत्येकी दहा खाटांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या रुग्णालयासाठी मंजूर २५ कायम पदांपैकी पाच जागा रिक्त आहेत. पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर दात्यांच्या मदतीने रक्तपेढी (ब्लड बँक) तसेच रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला असून ३२५ चौरस मीटर क्षेत्रफळात रुग्णालयाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात नव्याने तीस अतिरिक्त रुग्ण दाखल करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. त्याचबरोबरीने या विस्तारित इमारतीमध्ये दोन विशेष रुग्ण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

पालघर ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) कार्यरत असून या ठिकाणी सर्वसाधारण तसेच सिझेरियन प्रसुती करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विविध उपकरणे चालवण्यासाठी विद्युत प्रणाली जुनी झाल्याने रुग्णालयाच्या तळमजल्यावर नव्याने विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम  अंतिम टप्प्यात आहे. तसेच रक्तपेढीसाठी व रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन स्वतंत्र उद्वाहन (लिफ्ट) सुविधा जिल्हा नियोजनच्या विकास निधीमधून करण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीसाठी  किमान तीन वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित असून त्याकरता मंजूर असणारे मनुष्यबळ पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात वापरण्याचा प्रस्तावित आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यास पालघर रुग्णालयासाठी अतिरिक्त २० पदांवर कर्मचारी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होऊ शकतील याकडे येथील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित यांनी लक्ष वेधले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर या विस्तारित सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण होण्याची शक्यता असून तोपर्यंत मनुष्यबळाच्या मर्यादेचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक झाले आहे.

ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास विलंब

पालघर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू होईपर्यंत विक्रमगड तालुक्यातील रिवेरा संकुलात हंगामी पद्धतीने सुरू केलेल्या समर्पित करोना रुग्णालयाच्या ठिकाणी जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र या हंगामी सामान्य रुग्णालयाच्या भाडेबाबतचा प्रश्न निर्माण झाल्याने मनोर येथे राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या २०० खाटय़ांच्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय हंगामी पद्धतीने सुरू करण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. दरम्यान च्या काळापर्यंत पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात शहरी भागातील नागरिकांना सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

करोना केंद्रातील कंत्राटी मनुष्यबळ सेवा समाप्ती

पालघर येथील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आरोग्य पथकाच्या इमारतीत करोना उपचार केंद्र कार्यरत होते. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प असल्याने कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीअखेरीस कार्यमुक्त करण्यात आले आहे. या हंगामी रुग्णालयात आरोग्य पथकाच्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्याकडून सध्या उपचार व्यवस्था सुरू आहे.

२००८ साली कागदोपत्री मान्यता?

पालघर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन करण्यासाठी आरोग्य संचालनालयाकडे अर्ज करण्यात आला असून याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान सन २००८ मध्ये या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय रूपांतर केल्याचे कागदोपत्री आदेश निघाले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येते.