गावातील आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी महिलांचे योगदान
पालघर : पालघर ग्रामीण जिल्ह्यात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेऊन पाणी गुणवत्ता तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गावातील पाच महिला व जलसुरक्षक हे या पाण्याची गुणवत्ता तपासणी करत आहेत. गावातील सामान्य महिलांना पाण्याच्या गुणवत्तेचे व शुद्धतेचे पुरेपूर ज्ञान मिळत असल्याने गावाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी या महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्यक्ष पाण्याच्या स्रोताजवळ जाऊन पाण्याचा नमुना घेतला जात आहे. त्यानंतर पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करून आलेला अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर ग्रामपंचायतीमार्फत नोंदवला जाणार आहे. एखाद्या पाणी स्रोताच्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास ग्रामपंचायतीला कळवून स्रोताची स्वच्छताही करून घेतली जाणार असल्याने गावाच्या आरोग्यासाठी पाणी गुणवत्ता तपासणी करणाऱ्या महिलांचा वाटा व योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत शुध्द पाणीपुरवठय़ासाठी जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील ८८६ महसूल गावांत प्रत्येकी पाच महिलांच्या माध्यमातून ११ हजार ७२७ पाणी स्रोतांची तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी खरेदी केलेल्या किटद्वारे जलस्रोत यांची तपासणी होत आहे.
संचाद्वारे जैविक पाणी तपासणी
पाणी तपासणी संचाद्वारे जैविक तपासणीही केली जात आहे. तसेच किटमध्ये असलेल्या लहान काचेच्या बाटलीत पाणी स्त्रोतांचे नमुने भरून सामान्य तापमानात ४८ तास ठेवले जाते. या बाटलीतील पाण्याचा रंग आहे तसाच राहिला तर ते पिण्यास योग्य आहे. जर पाण्याचा रंग बदलला किंवा काळा झाला तर पाणी पिण्यास अयोग्य आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच अस्वच्छ स्त्रोतांची पाणी स्वच्छता, ते पिण्यास वापरू नये याविषयी पुढील कार्यवाही शासकीय यंत्रणेद्वारे केली जाईल.
जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू आहे. गावातील महिलांनाच पाणी गुणवत्तेचे प्रशिक्षण दिल्याने पाणी स्रेतांची निश्चित माहिती कळेल व गावकऱ्यांचे आरोग्य अबाधित राहील असा विश्वास आहे.
– सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., पालघर
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याचा अधिकार आहे व त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशनअंतर्गत कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमात महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. तसेच गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल .
– वैदेही वाढाण, अध्यक्षा, जिल्हा परिषद पालघर