पालघर : पालघर-बोईसर रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयापासून गोठणपूर परिसरापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे.
पालघर-बोईसर रस्ता नव्याने तयार केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून पालघरकडे येणाऱ्या गोठणपूर रस्त्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. तारापूर व पालघर औद्योगिक वसाहतीतील नोकरदार, मार्गावरील गावातील नागरिक, अवजड वाहतूक याच मुख्य मार्गाने ये-जा करीत असतात. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यापासून हा रस्ता वर्दळीचा रस्ता बनला आहे. पूर्ण रस्ता रुंदीकरण न झाल्याने या भागात वाहतूक कोंडी होत असे. या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही रस्त्यावरून चालताना असुरक्षित वाटत होते. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी रस्ता रुंदीकरण सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. हे रुंदीकरण होत असताना कामाचा दर्जा राखला जावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीची व नागरिकांची समस्या समोर आल्यानंतर तातडीने रुंदीकरणाच्या सूचना देऊन काम सुरू केले आहे. पालघर बोईसर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. – माधव संकपाळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
समस्या समजून सार्वजनिक बांधकाम विभागाने शीघ्र प्रतिसाद देत काम सुरू केल्याचे समाधान आहे. सुरू असलेले काम दर्जेदार व चांगले व्हावे हीच अपेक्षा आहे. – प्रल्हाद कदम, माजी नगरसेवक व सदस्य, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती