सुधीर कुलकर्णी response.lokprabha@expressindia.com

ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले सॅण्टोरिनी हे ग्रीकमधील एक महत्त्वाचे आणि पर्यटकप्रिय बेट. इथे सुरू असलेल्या उत्खननातून गतकाळातील वैभवाच्या खुणा पहायला मिळतात.

ग्रीस देश हा अनेक बेटांचा समूह आहे. सॅण्टोरिनी हे त्यापैकी एक. ते जलमार्ग तसेच वायुमार्गाने राजधानी अथेन्स तसेच मिकोनोस बेटाला जोडलेले आहे. परंतु बहुतांशी पर्यटक अथेन्सहून बोटीने मिकोनोसला भेट देऊन नंतर या बेटावर जाणे पसंत करतात, तर काही पर्यटक क्रूझ शिपच्या सफरीत दोन्ही बेटांना एक दिवसाची भेट देतात. हे बेट चिनी पर्यटकांचे इतके आवडते ठिकाण आहे की चीनवरून इथे थेट विमानसेवा आहे असे ऐकण्यात आले.

मिकोनोसहून १४६ किमीवर असलेल्या सॅण्टोरिनी बेटावरील अ‍ॅथिनिऑस बंदरावर पोहोचायला एक्सप्रेस बोटीने फक्त पावणेदोन तास लागले. सप्टेंबर महिन्यात असलेला कमी तीव्रतेचा सूर्यप्रकाश, त्यामुळे निरभ्र आकाश, तसेच खाली निळ्याशार एजियन समुद्र आणि बोटीवरील सहप्रवाशांशी गप्पा यात वेळ कसा गेला हे कळलेच नाही.

बोटीत एका ग्रीक-अमेरिकन पर्यटकाशी ओळख झाली. तो सध्या अथेन्समधील एका शाळेत मुलांना इंग्रजी शिकवतो. वीकएण्डसाठी तो सॅण्टोरिनी बेटावर निघाला होता. त्याला ग्रीस देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘मागच्या वर्षी आमच्याकडे देशाला आर्थिक संकटातून कसे सोडवायचे याचा मार्ग शोधण्यासाठी तीन निवडणुका झाल्या.  युरोपियन युनियन, युरोपियन सेंट्रल बँक आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMP) या तिन्ही संस्थांनी ग्रीसला तारण्यासाठी २००७ नंतर अनेकदा पतपुरवठा केला. त्याबद्दल काही पथ्येही पाळायला बजावले. त्यात करामध्ये वाढ, सरकारी नोकऱ्यात, पगारांत आणि पेन्शनमध्ये कपात, सेवानिवृत्ती वयात वाढ, तसेच आर्थिक व्यवस्थेत सुधारणा करणे अशा अटीही घातल्या. यातील बऱ्याच अटींची अंमलबजावणी ग्रीस सरकारने सुरू केली आहे आणि ती तशीच चालू राहिली तर काही वर्षांत देशाची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे असे मला वाटते!’ (ऑगस्ट २०१८ च्या आयएमएफच्या अहवालानुसार ग्रीसची अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यास आणखी १०-१२ वर्षे तरी लागतील असा अंदाज आहे.)

एजियन समुद्रातील डेलोस बेटाभोवती अनेक वर्तुळाकार बेटे भूकंपामुळे तयार झाली आहेत. त्यांना सायक्लेडस संबोधतात. सागराचा राजा पोसायडन याने संतापून सायक्लेड अप्सरांना  शाप दिला आणि त्यांची बेटे झाली असे ग्रीक पुराणकथांत लिहिलेले आहे. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकाने या बेटाचा आकार चंद्रकोरीसारखा झाला आहे. बेटाचे एकंदर क्षेत्रफळ ७३ किमी असून स्थानिक लोकसंख्या १५ हजार आहे. पण उन्हाळ्यात (एप्रिल ते ऑक्टोबर) इथे २० लाख पर्यटकांची वर्दळ असते.

तेराव्या शतकात येथे सॅण्टा आयरिन नावाचे कॅथॉलिक चर्च होते. त्यामुळे बेटाचे सध्याचे नांव प्रचलित झाले. त्यापूर्वी कॅलिस्टे (kalliste) म्हणजे ग्रीक भाषेत ‘सर्वात सुंदर’ म्हणून बेट ओळखले जात होते. १९ व्या शतकापासून कागदोपत्री थेरा (Thera) अशी त्याची नोंद आहे. इ.स. पू. १६०० च्या आसपास झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने इथे निर्माण झाला ‘ज्वालामुखी काहील’! त्याचा आकार १२ किमी बाय सात किमी तर खोली ४०० मीटर असून तीन बाजूचे उभे कडे ३०० मीटर उंचीचे आहेत. बेटाच्या इतर भागात चौपाटय़ा आहेत, परंतु त्या मिकोनोस बेटावरील चौपाटय़ांसारख्या प्रसिद्ध नाहीत.

बेटाच्या मध्यभागी कॅलडेराच्या कडय़ावर राजधानीचे शहर फिरा वसलेले आहे. इथून कॅलडेरातील जुन्या बंदरापर्यंत खाली उतरायला पायऱ्या आहेत. या बंदरावर फक्त लहान बोटीच येऊ शकतात. पायऱ्या उतरताना तुम्हाला त्याचवेळी इथल्या प्रसिद्ध वाहकांवरून -गाढवांवरून जाणाऱ्याशी स्पर्धा करावी लागते. ते टाळायचे असेल तर वरून खाली जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था आहे. देशात १९६७-७४ मध्ये लष्करी अंमल होता, त्या काळात त्यांनी बेटावरील सर्व इमारतींना पांढरा आणि निळा रंग देण्याचा कायदा अमलात आणला. त्यानुसार इथे घुमट निळे आणि बाकीचा रंग पांढरा असल्याचे दृष्टीस पडते. सन २००३ मध्ये आलेल्या ‘चलते चलते’ या हिंदी चित्रपटात हे दृश्य पाहायला मिळते. फिरामधील बारमध्ये बसून मद्याचे घुटके घेत सूर्यास्त पाहण्याचा आनंद लुटता येतो.

बोटीवरील हवा एकदम कोरडी पण वारा जोराचा असतो. इथल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या सुपीक जमिनीत द्राक्षाची लागवड करतात. त्यापासून तयार केलेली  वाईन हे इथले मुख्य उत्पादन. बेटावर पाऊस फारसा पडत नाही, त्यामुळे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे इथले शेतकरी अनोख्या पद्धतीने द्राक्षाचे पीक घेतात. ते द्राक्षांचे वेल जमिनीला लागूनच ठेवतात, त्या योगे वाऱ्याच्या जोरामुळे वेली वाकत नाहीत. त्या जमिनीलगतच्या वेलींच्या वेटोळ्यात शेतकरी स्पंजास्म (pumice) ठेवतात. स्पंजास्म रात्रीच्या हवेतील ओलेपणा साठवून दिवसा तो द्राक्षवेलींना पुरवतात. या पद्धतीमुळे द्राक्षे पाण्याविना वाढू शकतात.

बेटाच्या दक्षिणेला आक्रोटिरी गावाजवळ ब्रॉन्झ युगातील मिनोन संस्कृतीचे (इ.स. पू. २६०० ते इ.स. पू. १६००) अवशेष सापडले. क्रीट बेटावरील ही संस्कृती इतर एजियन बेटावर या काळात पसरलेली होती. या अवशेषांचे उत्खनन सन १९६७ पासून सुरुवात करण्यात आली. त्यावरून इथे मच्छीमारी तसेच शेती करणाऱ्यांची वस्ती असल्याचे स्पष्ट झाले. सायप्रस आणि क्रीट बेटांच्या व्यापारी मार्गावर सॅण्टोरिनी असल्यामुळे अक्रोटिरी भागाची भरभराट होऊ लागली. इ.स. पू. १६०० च्या आसपासच्या प्रचंड ज्वालामुखीची राख या गावावर पडली आणि ते गाडले गेले. इटलीतील पॉम्पे शहर व्हेसिव्हियस ज्वालामुखीच्या राखेत गाडले गेले होते तशीच घटना इथे घडली. मात्र इथल्या उत्खननावरून असे दिसते की ऑक्रोटिरी रहिवाशांना ज्वालामुखीच्या राखेत शहर गाडले जात असल्याची कल्पना आल्यामुळे त्यांनी इथून पळ काढला असावा. कारण इथे  पॉम्पेप्रमाणे गाडल्या गेलेल्या माणसांचे अवशेष दिसत नाहीत.

येथील उत्खननाच्या अभ्यासातून असा अंदाज मांडला गेला आहे की हे ठिकाण प्लॅटोच्या (Plato) अटलांटिस सागरात बुडालेल्या शहराच्या कथेशी मिळतेजुळते आहे. या भागातील तुफानी वारा आणि कडक ऊन यांच्यापासून संरक्षणासाठी  तसेच उत्खननासाठी छत उभारण्यात येत होते. मात्र ते पूर्ण होण्याआधी २००५ मध्ये कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. मात्र या अपघातामुळे उत्खननातील अवशेषांचे नुकसान झाले नाही. त्यानंतर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले हे ठिकाण ते परत एप्रिल २०१२ नंतर खुले करण्यात आले.

आतापर्यंतच्या उत्खननात अजूनही उत्तम स्थितीत असलेले लाकडी सामान, मातीची भांडी, आणि भित्तिलेपचित्रे सापडलेली आहेत. या चित्रांवरून तीन मजली इमारती अजूनही तग धरून राहिलेल्या दिसतात. या घरात शौचालय अगदी वरच्या मजल्यावर होते आणि गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून सांडपाणी नळाद्वारे खालच्या मजल्यावर रस्तापातळीवर आणण्याची व्यवस्था होती. जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्याच्या साहाय्याने गरम पाणी आणि गार पाणी असे वेगवेगळे नळ घरामध्ये पाहायला मिळतात. या सर्व पुराव्यांवरून पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी ही वसाहत त्या काळच्या मानाने चांगलीच विकसित होती असा अंदाज बांधलेला आहे. इथे सापडलेल्या कलाकृती आणि वस्तू जवळच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. उत्खननाचे काम अजूनही चालू आहे आणि त्यावरून भविष्यात इथल्या संस्कृतीविषयी आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.