बॉम्बस्फोटामुळे आम्ही इस्तंबूलला जाणं टाळावं अशी मुलांची इच्छा होती. पण हॉटेल मॅनेजरशी बोलून, परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही जायचा निर्णय घेतला आणि जगातलं एक नितांतसुंदर शहर पाहिल्याचा आनंद मिळाला.

खारकोव्ह हे युक्रेन देशातील एक मोठं शहर. माझ्या सूनबाईचं माहेर. तिथे जाण्यासाठी स्वस्तातली विमानसेवा धुंडाळायला सुरुवात केल्यावर मुंबईवरून तिथे जाण्यासाठी अजिबात सोयीची विमानसेवा नाही हे लक्षात आलं. महागडी तिकिटं आणि दोन-तीन ठिकाणी विमानं बदलून जावं लागणार आहे हे लक्षात आलं. नकाशा पाहिल्यानंतर एक गोष्ट ध्यानात आली होती, ती म्हणजे ब्लॅक सी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या समुद्राच्या एका बाजूला टर्की म्हणजेच तुर्कस्तान हा देश आहे आणि दुसऱ्या बाजूला युक्रेन. शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की, इस्तंबूल या टर्कीच्या राजधानीतून युक्रेनच्या खारकोव्ह या शहरात बऱ्याच फ्लाइट्स जातात, त्याही अगदी स्वस्तात! शिवाय मुंबईहून इस्तंबूलला जाणाऱ्या फ्लाइट्सही भरपूर आहेत आणि त्याही बऱ्यापकी स्वस्तात. मग ठरवलं, इस्तंबूलमाग्रे खारकोव्हला जायचं आणि येताना अथवा जाताना इस्तंबूल पाहायचं. भटकायची आवड असलेल्या मला एका ट्रिपच्या विमानखर्चात दोन देश करायला मिळणार म्हटल्यावर आणखीन काय हवं होतं. ही गोष्ट मनाशी ठरवली आणि तसं मुलाला सांगितलं, पण मी इस्तंबूलचे नाव काढले आणि तो वैतागलाच.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
Miri Regev
लाल समुद्रातील हुथींच्या संकटात भारतानं इस्रायलसाठी तयार केला नवा व्यापारी मार्ग, नेमका फायदा काय?
people, blocked Chinchoti Kaman Bhiwandi road, protest
चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको 

‘‘आईऽऽ तुला दुसरा कुठला पर्याय नाही का मिळाला. अगं, काय काय चाललं आहे त्या इस्तंबूलमध्ये आणि टर्की देशामध्ये. नुकतेच तिथं दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले होते. तू बातम्या बघत नाहीस का? ते काही नाही. नो इस्तंबूल. मुंबईहून डायरेक्ट फ्लाइट घ्या.’’

‘‘अरे बाबा, नाहीत ना डायरेक्ट फ्लाइट आणि एखादा बॉम्बस्फोट झाला म्हणजे तिकडे जायचंच नाही की काय. मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा टुरिस्टनी येणंच बंद केलं होतं का?’’ पण माझं बोलणं त्याला ना पटलं ना आवडलं. त्याचं म्हणणंही बरोबर होतं. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांचे केंद्र असणाऱ्या सीरिया देशाला लागूनच टर्की देशाची बॉर्डर आहे आणि या आयसिसने जगाला वेठीस धरलंय हे सर्वानाच ठाऊक आहे.

‘‘अरे बाबा, इस्तंबूल सीरियन बॉर्डरपासून किती लांब आहे आणि ते फार छान आहे असं वाचलयं मी. बघायचंय मला.’’

मुलाची समजूत काढली आणि मी इस्तंबूलमाग्रे खारकोव्हला जाण्याची विमानाची तिकिटं बुक करायचं ठरवलं..! सौदी एअरलाइन्सची तिकिटं सर्वात स्वस्त होती.

‘‘अगं आई, काय करते आहेस तुझं तुला तरी कळतंय का? स्वस्तातलं म्हणून कुणी सौदी एअरलाइनचं तिकीट बुक करेल का? अगं, तू रमादानच्या दिवसांत, जेधामध्ये अकरा तासांचा लेओव्हर असणाऱ्या विमानानं एकटी जायला निघाली आहेस.’’ गेली सहा वष्रे तो त्याच भागात राहतोय, शंभर वेळा सौदीला जातो. त्यामुळे तिकडे काय परिस्थिती असते याची त्याला पुरेपूर कल्पना होती. ‘‘अगं, तुला पाणीसुद्धा प्यायला मिळणार नाही तिथे. खायची गोष्ट तर दूरच.’’ तो हे बोलला आणि मग माझ्या लक्षात आले! मग ठरवले की, आधी युक्रेनमध्ये राहून मग येतानाच इस्तंबूल करायचे. इकडची- तिकडची माहिती काढून तुर्की देशातील आठ दिवसांच्या भटकंतीचे सर्व प्लॅनिंग गुगलच्या मदतीने करून टाकले आणि निश्चिंत झाले.

पण हे एवढय़ावरच थांबणार नव्हतं. निघायची तयारी झाली आणि दोन तारखेला शेजारणीचा फोन..

‘‘राधिका, तू गेली नाहीस ना अजून इस्तंबूलला.’’

‘‘नाही. उद्या रात्रीची फ्लाइट आहे. का ग?’’

‘‘अगं, बातम्या लावतेस का..’’ बातम्या पाहून डोक्याला हात लावून घेत मटकन खालीच बसले. इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. अडतीस लोक ठार झाले होते. विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे, असं सांगण्यात येत होतं. मी एकटीच जाणार होते. अतातुर्क विमानतळावर उतरून मला सबिहा नावाच्या इस्तंबूलमधील दुसऱ्या विमानतळावर जायचं होतं आणि तिथून पुढचे विमान पकडायचे होते. मुलगा, सून आणि नातू युक्रेनमध्ये होते. मुलाला मेसेज केला. तुर्कीच्या मुंबई येथील वकिलातीमध्ये फोन लावला, तर त्यांनी सांगितले, विमानतळ चालू करण्यात आला आहे. कुवेत एअरवेजला फोन केला तर त्यांनी कळवले, तुम्हाला विमान कॅन्सल करावयाचे असल्यास रिफण्ड देण्यात येईल; पण इस्तंबूलला जाणारी विमानं रद्द झालेली नाहीत. तुम्ही ठरल्या वेळेप्रमाणे विमानतळावर या. ठरल्याप्रमाणे कुवेत एअरवेजच्या विमानानं इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर पोहोचले. व्हिसा स्टँप करून घेतला आणि साबिहा या दुसऱ्या एअरपोर्टकडे जाण्यासाठी टॅक्सी केली. त्या दिवशी अतातुर्क विमानतळावर पोहोचल्यानंतर मला वाटले होते की, आदल्या दिवशीच्या बॉम्बस्फोटाच्या खाणाखुणा पाहायला मिळतील; पण अशी विदारक घटना घडून गेली होती याचा मागमूसही तिथे पाहायला मिळाला नाही.

मी खारकोव्हला सुखरूप पोहोचले आणि सर्वानीच नि:श्वास सोडला. रशियन पाहुणचाराचा आनंद घेऊन, नातवाबरोबर सोळा-सतरा दिवस मजेत घालवल्यानंतर, अठरा तारखेला इस्तंबूलसाठी निघायचे होते. नेमके दोन दिवस आधी तुर्कीमध्ये बंड झाल्याच्या बातम्या येऊन पोहोचल्या. आर्मीमधील एका गटाने बंड केले. हे बंड जरी अंकारा या तुर्कीच्या राजधानीच्या शहरात झाले होते तरी तुर्की लष्करातील या बंडखोरांनी इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर गोळीबार करून विमानतळ ताब्यात घेतले. या सर्व गोंधळात दोनशेच्या वर लोक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या टीव्हीवर पाहण्यात आल्या. आम्हाला तर युक्रेनमध्ये असल्या कारणाने धड बातम्याही पाहाता येत नव्हत्या, कारण सर्व चॅनल रशियन भाषेतून असायचे. फक्त एका चॅनलवर इंग्रजीतून बातम्या ऐकायला मिळाल्या. या घटनेनंतर आमची दोन्ही मुलं माझ्यावर इतकी चिडली की, विचारता सोय नाही. दोन्ही मुलांची एकच इच्छा होती, ती म्हणजे तिकीट कितीही महाग असले तरी इस्तंबूलला न जाता इतर मार्गाने जावे. त्यामुळे पुन्हा एकदा सुयोग्य तिकीट शोधायला बसलो, पण खारकोव्ह हे युक्रेनमधील शहर आडबाजूला असल्यामुळे तेथून फार थोडी विमानं उडायची आणि ती फक्त काही ठरावीक शहरांकडेच जात होती. या दरम्यान तुर्कीच्या अध्यक्षांचे ‘तुर्की सरकारला लष्कराचे बंड मोडून काढण्यात यश आले असून इस्तंबूल आणि तुर्कीच्या इतर भागांतील स्थिती पूर्ववत झाली असल्याचा संदेश देणारे भाषण सर्व चॅनल्सवरून दाखवण्यात येऊ लागले. मी ज्या हॉटेलचे आरक्षण केले होते त्या हॉटेल मॅनेजरला मेल पाठवून इस्तंबूलमधील परिस्थिती वास्तवात कशी आहे ते कळवावे, अशी विनंती केली. हॉटेल मॅनेजरचे उत्तर आले. ‘तुम्हाला ट्रिप कॅन्सल करावयाची असल्यास खुशाल करा. आम्ही तुमचे पसे अजिबात कापणार नाही, पण मी तुम्हाला मनापासून विनंती करतो की, तुम्ही तसे करू नये, कारण इस्तंबूल शहरातील परिस्थिती आता पूर्णपणे पूर्वपदावर आलेली आहे. पर्यटक येताहेत, राहताहेत. तुम्हीही यावे आणि तुर्की आदरातिथ्याचा आनंद घ्यावा.’ हे पत्र वाचून मी ठरवले की, इस्तंबूलला जायचेच. तिकडे पोहोचल्यानंतर अतातुर्क विमानतळाच्या बाहेर माझ्या नावाचे प्लॅकार्ड घेऊन उभ्या माणसाला पाहिले आणि जीव भांडय़ात पडला. एकरीम हा त्या हॉटेलचा मॅनेजर कम मालक असल्याचे हॉटेलवर पोहोचल्यानंतर माहीत झाले. हा अतिशय देखणा, रांगडा तुर्की तरुण आमच्या इस्तंबूलमधील वास्तव्यादरम्यान हरतऱ्हेने आमच्या मदतीस तत्परतेने हजर असायचा. सलीम, एकरीम आणि त्यांचा लहान भाऊ या तिघा भावंडांच्या अगत्यशीलतेमुळे आमचा मुक्काम अत्यंत आनंददायी झाला.

अंकारा ही तुर्कस्तान देशाची राजधानी असली तरी ‘इस्तंबूल’ हे देखणे शहर प्रामुख्याने तुर्कीचे आíथक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इस्तंबूल शहराचे दुसरे महत्त्व म्हणजे हे शहर युरोप आणि आशिया या दोन खंडांना जोडणारे शहर आहे. काळा समुद्र आणि मरमरा समुद्र यांना जेडणाऱ्या बोस्फोरस सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंना इस्तंबूल हे शहर वसलेले आहे. ही सामुद्रधुनी युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांना वेगळे करते. मात्र इस्तंबूल अध्रे युरोपमध्ये आहे तर अध्रे आशिया खंडात. त्यामुळेच या शहराला खूप मोठी ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे.

आम्ही दुपारी इस्तंबूलमध्ये पोहोचलो. हॉटेल फार महागडे नसले तरी अतिशय छान होते. मुख्य म्हणजे सुलतान अहमत या अगदी मध्यवर्ती ठिकाणी होते. या ठिकाणापासून सर्व महत्त्वाची पर्यटन स्थळे अक्षरश: पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर होती. माझ्या मनावर प्रचंड दडपण होते, पण सलीम या हॉटेल मालकाने आम्हाला इतके सुंदर मार्गदर्शन केले की, त्यानंतर कुठलीही मदत न घेता आम्ही तीन दिवसांत सर्व ठिकाणी मनसोक्त भटकंती केली. खरोखरच मला हे शहर फार फार आवडले! इतके मोठे अस्ताव्यस्त पसरलेले हे शहर अप्रतिम, देखणे आहेच, पण तितकेच स्वच्छ आणि सुंदर आहे.

पोहोचलो त्या दिवशी मनावर थोडे दडपण घेऊनच जवळ असलेली ‘ब्लू मॉस्क’ पाहायला गेलो. या मॉस्कच्या समोरच ‘हाजिया सोफिया’ हे म्युझियम आहे. सुरेख कारंजा, मस्जीद आणि अयासोफिया या दोन्ही इमारतींना केलेले सुरेख लायटिंग यामुळे सुलतान अहमत चौकाचा तो परिसर उजळून निघालेला होता. दोन मिनिटांच्या अंतरावरून दर मिनिटागणिक ये-जा करणाऱ्या सुंदर ट्रॅम पाहून तर आपण एका मुस्लीम देशात आहोत हे खरे वाटत नव्हतेच. सगळा परिसर पर्यटकांनी गजबजून गेलेला होता.

दुसरे दिवशी सकाळीच भरपूर भटकायच्या तयारीने बाहेर पडलो. सोबत इस्तंबूलचा नकाशा, सलीमने दिलेल्या सूचनांचा कागद, कॅमेरा होता! ट्रॅमने ग्रँड बझारकडे जायचे म्हणून गेलो तर कळले की ट्रॅम फ्री आहे. घडलेल्या घटनेमुळे आणि पुन्हा काही वाईट घटना घडल्यास लोकांना तातडीने परिवहनाची सोय असावी म्हणून ट्रॅम, बसेस, मेट्रो या सर्व सेवा आठवडाभर फ्री ठेवण्यात आल्या होत्या. मग काय, आमची तर चनच झाली. त्या दिवशी आधी इथल्या जगप्रसिद्ध ‘ग्रँड बझार’मध्ये गेलो. एक तर तिथे युरोला बऱ्यापकी चांगला एक्स्चेंज रेट मिळेल असे सांगण्यात आले होते. शिवाय या बझारबद्दल खूप ऐकले होते. खरोखरच खूप मोठे मार्केट आहे. सर्व प्रकारच्या चीजवस्तू बाजारात होत्या, पण तुर्की गालिचे आणि दागिन्यांची दुकाने पाहून डोळे दिपले. तुर्की लोकांच्या मनात भारतीयांबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचे सिनेमे आणि शाहरूख व आमिर खान या लोकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असल्याचे जाणवले.

ग्रँड बझार पाहून झाल्यानंतर लांबची पर्यटन स्थळे करावयाची असे ठरवून बाहेर पडलो. ट्रमने इमोमीनो स्टेशनला गेलो आणि बोस्फोरस क्रुझ घेतली. खरोखरच, ही क्रूझ हा आमच्या इस्तंबूलमधील भटकंतीचा हायलाइटच होता. इस्तंबूल शहर एका बाजूने मरमरा या समुद्राच्या बाजूला वसलेले आहे तर दुसरीकडे बोस्फोरस सामुद्रधुनीच्या दुतर्फा! युरोप आणि आशिया खंडांना एकमेकांपासून अलग करणाऱ्या या सामुद्रधुनीतून मोठय़ा बोटीतून केलेली समुद्रसफर म्हणजे मस्त अनुभव. एका बाजूला जुन्या ऐतिहासिक वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवणारे सुंदर इस्तंबूल शहर तर दुसऱ्या काठावर आशिया खंडात येणारे इस्तंबूल. काय तो पाण्याचा गडद निळा रंग. त्यातून वेगाने तरंगत जाणाऱ्या पांढऱ्या शुभ्र रंगातील सुंदर यॉट. जणू राजहंसच विहरताहेत. समुद्रही इतका स्वच्छ आणि गडद निळ्या रंगात रंगलेला की मन प्रसन्न होऊन जायचं. या बास्फोरस समुद्रधुनीच्या दोन्ही काठावर वसलेले इस्तंबूल तितकेच सुंदर आहे. यापकी डोलमाबाची पॅलेस हा ऑटोमन खलिफांच्या ऐश्वर्याचे प्रतीक आहे. हा पॅलेस पाहायला बराच वेळ द्यावा लागतो. या पॅलेसच्या आवारात या मुस्लीम राज्यकर्त्यांचे पेंटिंग्जचे कलेक्शन पाहायला मिळते. तसेच घडय़ाळांचे म्युझियमही पाहण्यासारखे आहे. इस्तंबूल शहरात अनेक मोठमोठय़ा मशिदी बांधण्यात आलेल्या आहेत. या सर्व मशिदींची स्थापत्यशैली सर्वसाधारणपणे सारखीच आहे. त्यामुळे इस्तंबूल शहराच्या क्षितिजावर आपल्याला जागोजागी निळ्या मशिदीसारख्याच अनेक मशिदी पाहायला मिळतात. आकाराने बहुतेक सर्व मशिदी भव्य असून प्रत्येक मशिदीचा वेगळा इतिहास आहे. खरं तर इस्तंबूल शहरात खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेतच. जमिनीच्या खाली असलेले पाण्याचे नहर, म्हणजेच बॅसिलिका सिस्टर्न हे अवश्य पाहावे असेच आहे.

ग्रँड बझारप्रमाणेच स्पाईस मार्केटही बघण्यासारखेच आहे. पण आपण भारतीय तेथे काय खरेदी करणार! या बाजारातून फक्त टर्कीश कॉफी विकत घेतली. बाकी हे टर्कीश कॉफी प्रकरण भलतेच प्रसिद्ध आहे. ही कॉफी अगदी चिटुकल्या कपातून दिली जाते. पण ही कॉफी इतकी स्ट्राँग असते की ती पिणे सर्वाच्या बसकी बात नसते हे नक्की! टर्कीश स्त्री-पुरुष दिसायला अतिशय देखणे असतात. मुळात हा देश मुस्लीम असला तरी येथील मुसलमान फार कर्मठ नाहीत. दाढी असणारे पुरुष अभावानेच पाहायला मिळाले. युरोपीयन लोकांप्रमाणेच गोरेपान, गुलाबी गोरे, उंचेपुरे आणि तगडे पुरुष फारच देखणे असतात. स्त्रियांनी हिजाब वापरलाच पाहिजे अशी सक्ती नाही. त्यामुळे बहुतांशी स्त्रिया युरोपियन स्त्रियांप्रमाणे मॉडर्न कपडय़ांमध्येच वावरताना दिसतात. विशेष म्हणजे स्त्रिया दिसायला अतिशय सुंदर असतात. जेव्हा कधी पोलीस अथवा सरकारी व्यक्तीशी बोलायची वेळ आली तेव्हा प्रत्येक जण अदबीने बोलत असल्याचे प्रकर्षांने जाणवले. दोन-तीन तरुण मुलींनी आपणहून बोलून, िहदीस्तानला येणार असल्याचे आवर्जून सांगितले. कारण एकच. त्यांना आमिर खान फार आवडतो.

इस्तंबूल शहरातील बरेच रस्ते दगडी पेव्हरब्लॉकनी तयार केलेले आहेत. युरोपीयन पद्धतीचे. लहानलहान गल्ल्यांमधून रस्त्यावर बाकडी टाकून थाटलेली इथली रेस्टॉरंट्स भारी आवडली. प्रश्न असायचा तो काय ऑर्डर करायचे याचा. कारण व्हेजिटेरियन डिश मिळणे अशक्यच असायचे. ‘फलाफल’ या नावाचा एक प्रकार आम्ही घ्यायचो. जे मद्याच्या पोळीची भाजी भरलेली गुंडाळी असायची. संध्याकाळच्या वेळेस सुलतान अहमत चौकात प्रचंड गर्दी असायची. मात्र पोलीस आणि आर्मीचे सशस्त्र जवान सर्वत्र नजर ठेवून असायचे. याच चौकात निळ्या मशिदीच्या समोर एक हॉटेल आहे. या ठिकाणी हुक्का पिण्याची सेय होती. त्यामुळे बरेचसे पर्यटक हा शौक पुरा करण्याच्या हेतूने गर्दी करायचे. सूर्यास्तानंतर तिथे सुफी संगीताचा कार्यक्रम असायचा. एक बुजुर्ग कलाकार हातातील वाद्याच्या साथीने इतक्या आत्मीयतेने भारदस्त आणि खडय़ा आवाजात गायचे की त्यांचे गाणे अगदी काळजाला स्पर्श करून जायचे. संगीताला भाषेच्या मर्यादा असू शकत नाहीत याची जाणीव हे संगीत ऐकताना प्रकर्षांने झाली. या गाण्यावर त्यांचा पांढराशुभ्र सुफी वेश परिधान केलेला जोडीदार गोल गोल गिरक्या घेत नृत्य सादर करायचा. या वाद्याला ‘उद’ असे म्हणतात असे नंतर माहीत झाले.

एकुणात काय; माझी चार दिवसांची इस्तंबूलची भटकंती इतकी मस्त आणि स्वस्त झाली की बस्स! भटकताना कुठेही दहशतवाद्यांच्या कारवायांचे सावट जाणवले नाही. गर्दीने आणि पर्यटकांनी फुलून गेलेले इस्तंबूल मनाला आत्यंतिक भावले. तुर्की आतिथ्य अगत्यशील आहे यात शंकाच नाही. आशियातील एका सुंदर शहराला भेट दिल्याचा मनापासून आनंद मिळाला हे तर खरेच. पण नंतरच्या तीन दिवसात तुर्कीतील कापाडोकीया आणि पामुककाले या दोन आगळ्यावेगळ्या स्थळांना भेट दिल्यानंतर हा आनंद द्विगुणीत झाला होता.
राधिका टिपरे – response.lokprabha@expressindia.com