-
मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या चर्चेत आहेत. नुसरत जहाँ आई होणार असल्याचं बोललं जात असून, त्याबद्दल त्यांचे पती निखील जैन यांना काहीही माहिती नसल्याची चर्चा होती. ही चर्चा होत असतानाच नुसरत जहाँ यांनी मंगळवारी समोर येत, त्यांच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला. यावेळी त्यांनी सात मुद्दे मांडत निखिल जैनसोबत असलेल्या नातेसंबंधाची माहिती दिली. काय आहेत ते सात खुलासे? जाणून घेऊयात…
-
१९ जून २०१९ रोजी टर्कीतील बोद्रममध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी लग्न केलं होतं. नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण, आज त्यांनी एका निवेदनाद्वारे लग्नाबद्दलच्या सगळ्या बाबी स्पष्ट केल्या. त्याचबरोबर निखिल जैन यांना हिरो बनवू नये, असंही त्या म्हणाल्या आहेत.
-
पहिला मुद्दा – टर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांचं हे लग्न होतं. त्यामुळे त्याची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणं गरजेचं होतं, पण ते कधीच झालं नाही. टर्कीच्या कायद्यानुसार हे लग्न नसून ते एक रिलेशिनशिपच होती. फार फार तर त्याला लिव्ह-इन-रिलेशनशिप म्हणता येईल. त्यामुळे तलाक (घटस्फोट) घेण्याचा प्रश्नच नाही.
-
दुसरा मुद्दा – आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त मी त्यावर भाष्य करणं टाळलं होतं. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. कारण माझं वैयक्तिक जीवन हे स्वत: पुरतच मर्यादित ठेवू इच्छिते. माझं लग्न कधीच कायदेशीर नव्हतं आणि कायद्याच्या नजरेत त्याला लग्न म्हणताही येत नाही.
-
तिसरा मुद्दा – माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ नये, कारण ते माझं वैयक्तिक जीवन आहे. कथित लग्नच बेकायदेशीर होतं. त्यामुळे त्याला इतर गोष्टींशी जोडून बघू नये.
-
चौथा मुद्दा – तो (निखिल जैन) व्यक्ती स्वत:च्या श्रीमंत होण्याचे दावे करतो आहे. त्याचबरोबर त्याचा वापर केल्याचाही तो आरोप करतो आहे. पण वास्तव याउलट आहे. कारण खुप काळापासून तो माझ्याच खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे काढतो आहे. आम्ही वेगळे झाल्यानंतरही त्या व्यक्तीने (निखिल जैन) रात्री-मध्यरात्री माझ्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत. मी याबाबत पोलिसांत तक्रार केलेली आहे.
-
पाचवा मुद्दा- माझ्या अनेक वस्तू, ज्यात माझ्या बॅग्ज, कपडे आणि इतर गोष्टींचा समावेश आहे, त्या अजूनही त्या (निखिल) व्यक्तीकडेच आहेत. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, माझे सगळे दागिने जे माझ्या कुटुंबाने, मित्र, नातेवाईकांनी दिले होते ते अजूनही त्याच्याकडेच आहेत.
-
सहावा मुद्दा – तुम्ही ‘श्रीमंत’ आहात म्हणजे स्वत:ला पीडित म्हणून सांगू शकत नाही आणि एखाद्या महिलेवर खोटे आरोप करण्याचाही तुम्हाला अधिकार मिळत नाही. मी माझी ओळख मोठ्या मेहनतीतून निर्माण केली आहे आणि माझ्यामुळे मी कुणाला प्रसिद्ध होऊ देणार नाही.
-
सातवा मुद्दा – माझ्या वैयक्तिक नातेसंबंधाची चर्चा मी कधीच कुणाशी केलेली नाही. लोकांनीही अशी चर्चा करु नये. माझं मीडियालाही आवाहन आहे की, ज्या (निखिल जैन) व्यक्तीपासून मी खुप आधी वेगळी झाली आहे, त्याच ‘हिरो’ म्हणून चित्र रंगवू नये.
-
या सगळ्या प्रकरणावर निखिल जैन यांनीही मौन सोडत भूमिका मांडली आहे. "ती (नुसरत जहाँ) जे काही म्हणाली आहे, त्यावर मला प्रतिक्रिया देण्याची इच्छा नाही. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. मी कोलकाता येथे दिवाणी खटला दाखल केला आहे आणि तो न्यायालयात असेपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही," असं निखिल जैनने म्हटलं आहे. (सर्व छायाचित्र । नुसरत जहाँ इन्स्टाग्राम)

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप