कर्नाटकात सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसने विविध राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोमवारी मध्य प्रदेशचा दौरा केला. जाहीर सभेत त्यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. भ्रष्टाचार, बेरोजगारीपासून विविध विषयांवर हल्ला चढविला. त्यांनी व्यापम आणि रेशन वितरण घोटाळ्याचा हवाला देत सांगितले की, भाजपाच्या एकूण २२० महिन्यांच्या सत्ताकाळात २२५ घोटाळे झाले असल्याचा आरोप केला. हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस नेते आणि संभाव्य मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जबलपूरची सभा घेण्यापूर्वी नर्मदा घाटावर प्रियंका गांधी यांच्यासमवेत आरतीचा कार्यक्रम घेतला.

प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपाने राज्याला ‘रिश्वत राज’ (लाचखोरी राज्य) बनवले आहे. लोकांनी आपल्या चांगल्या भविष्यासाठी यापुढील काळात मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केले. तुम्हाला नोकरी हवी असेल किंवा एखादे छोटे काम काढून घ्यायचे असेल, तरीही लाच द्यावी लागते. मध्य प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे होत आहेत. रेशन घोटाळा, शिष्यवृत्ती घोटाळा, व्यापम घोटाळा, पोलीस भरती घोटाळा, वीज विभागात घोटाळा, कोविड घोटाळा, ई-टेंडर घोटाळा… अशा अनेक घोटाळ्यांची मोठी यादी आहे. ही तर मोदींच्या अपमानाच्या यादीपेक्षाही मोठी यादी झाली, अशी खोचक टीका प्रियंका गांधी यांनी केली.

हे वाचा >> कर्नाटकची पुनरावृत्ती मध्य प्रदेशमध्ये होणार? राहुल गांधी म्हणतात, आम्ही १५० जागा जिंकू

मध्य प्रदेशने तीन वर्षांत फक्त २१ नोकऱ्या दिल्या

राज्यातील बेरोजगारी संदर्भात बोलत असताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, चौहान सरकारने मागच्या तीन वर्षांत फक्त २१ नोकऱ्या देऊ केल्या आहेत. हा आकडा माझ्यासमोर आल्यानंतर मलाही आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या कार्यालयातून तीन वेळा ही माहिती पडताळून पाहण्यास सांगितले. मात्र पडताळणी केल्यानंतर हा आकडा खरा असल्याचे कळले.

कमलनाथ मुख्यमंत्री असताना काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली होती, याची माहिती देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, महिलांना प्रति महिना दीड हजारांचे अनुदान, गॅस सिलिंडरसाठी ५०० रुपयांचे अनुदान, १०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि २०० युनिटपर्यंत वापर असलेल्यांच्या बिलात ५० टक्क्यांची सूट, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी.. या विषयांवर कमलनाथ यांनी मुख्यमंत्री असताना काम सुरू केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची आश्वासने काँग्रेसने दिली होती.

लोकांनी भाजपाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असेही आवाहन काँग्रेस नेत्या गांधी यांनी केले. मुख्यमंत्री शिवराज चौहान हे ‘घोषणा वीर’ असल्याची टीका करण्यात आली. नजीकच्या काळात त्यांनी जवळपास २२ हजार घोषणा केल्या होत्या, जर त्यांनी या बदल्यात केवळ २२ हजार नोकऱ्या दिल्या असत्या तरी लोकांचा फायदा झाला असता. चौहान यांच्या सर्व घोषणांपैकी केवळ एक टक्का घोषणा पूर्णत्वास गेल्या असल्याचेही गांधी म्हणाल्या.

हे वाचा >> कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

भाजपा सरकारने रविवारी जाहीर केलेल्या लाडली बेहना योजनेवरही टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये पाठविण्यात येणार आहेत. सरकारने ही तत्परता आता का दाखविली? निवडणुकीला केवळ सहा महिने शिल्लक असताना सरकार पैसे देत आहे. तुम्ही तीन वर्षांपासून सत्तेत होता, मग तेव्हा या योजनेची घोषणा का नाही केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उज्जैन महाकाल लोक मंदिराच्या कॉरिडोअरमध्ये मागच्या महिन्यात वाऱ्याच्या तडाख्यामुळे काही मुर्त्या तुटून खाली पडल्या, यावरही उपरोधिक टीका करत असताना त्या म्हणाल्या की, भाजपाने माता नर्मदालादेखील सोडले नाही. त्यातही त्यांनी भ्रष्टाचार केला. हे लोक नेमके कुठे जाऊन थांबणार? तसेच राज्यात आदिवासी समाजाविरोधात वाढलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांवरही त्यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, “माझ्या आजी इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजासाठी किती काम केले, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आज तुमच्यावर जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मग ते वृद्ध किंवा तरुण असोत, आदिवासी किंवा दलित असोत. आकडेवारी आणि तुमचे अनुभवदेखील हेच सांगत आहेत.”

भाजपावर टीका करत असताना प्रियंका गांधी यांनी गांधी कुटुंबाच्या बलिदानाचा विषय काढून लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, “राजकारण्यांनी भावनेच्या मुद्द्याचे राजकारण करू नये. मी इथे तुमच्याकडे आम्हाला मत द्या, हे सांगायला आलेली नाही. मी तुम्हाला जागरूक करण्यासाठी आले आहे. कारण निर्माण करणे किती अवघड असते, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. या देशाला घडविण्यासाठी माझ्या कुटुंबाने बलिदान दिलेले आहे.”

आणखी वाचा >> मध्य प्रदेशात लग्नाच्या आधी वधूची गर्भधारणा चाचणी का करण्यात आली?

आगामी निवडणूक मध्य प्रदेशचे भविष्य ठरवणारी

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही भाजपावर सडकून टीका केली. “भाजपाने धर्माला वापरून राजकारण करण्याचा गलिच्छ प्रकार केला. राजकारण हे मूल्यांसाठी असते प्रसिद्धीसाठी नाही. भाजपाने धर्माला प्रसिद्धीचा मार्ग बनविले. मी हिंदू आहे आणि हे मी गर्वाने सांगू शकतो”, असे वक्तव्य कमलनाथ यांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले, भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेनंतर तुम्ही २०१८ साली काँग्रेसला मत देण्याचे ठरविले. शिवराज सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. राज्याला कोणत्या परिस्थितीत त्यांनी सोडले होते माहितीये का? मध्य प्रदेश शेतकऱ्यांच्या आत्महत्येत प्रथम क्रमाकांवर होते, बेरोजगारी, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये राज्य अग्रेसर बनले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमलनाथ पुढे म्हणाले की, ही निवडणूक मध्य प्रदेशचे भवितव्य ठरवणारी असेल. ही निवडणूक फक्त उमेदवारांची, पक्षांची निवडणूक नाही. ही निवडणूक मध्य प्रदेशचे भविष्य आहे. तुम्हीच ठरवा की भावी पिढीच्या हातात तुम्हाला कशाप्रकारचे राज्य द्यायचे आहे.