आसाराम लोमटे

परभणी : पालकमंत्रीपदाची सूत्रे आता राष्ट्रवादीतल्या अजीत पवार गटाचे संजय बनसोडे यांच्याकडे आली असून या घटनेने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतील असे चित्र आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याविषयी येथे मोठ्या प्रमाणात नाराजी होती. पालकमंत्री झाल्यानंतर सावंत यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ एक बैठक घेतली. सातत्याने परभणीकडे पाठ फिरवणार्‍या सावंत यांच्यावर खासदार संजय जाधव यांनी ‘टक्केवारी’सारखे गंभीर आरोपही केले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाबाबत फेरबदल होणे अपेक्षित असतानाच बनसोडे यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटाला आता बळ मिळणार आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

महाविकास आघाडीच्या काळात श्रीमती फौजिया खान यांच्या पालकमंत्री पदानंतर पुन्हा जिल्ह्यातल्या व्यक्तीकडे पालकमंत्रीपद आलेच नाही. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीमुळे श्रीमती खान यांना पालकमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर सुरेश धस, प्रकाश सोळंके हे पालकमंत्री झाले. महायुतीच्या सरकारमध्ये सुरुवातीला दिवाकर रावते व त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची सुत्रे आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर नवाब मलिक, काहीकाळ धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची सुत्रे आली.

हेही वाचा >>> कोल्हापूरातील साखर कारखान्यांसमोर कर्जाचा डोंगर; हंगाम सुरु करताना राजकीय नेतृत्वाचा कस

सावंत यांच्या नियुक्तीपासूनच अनेक वाद सुरु झाले. आधीचे पालकमंत्री किमान ध्वजारोहणासाठी तरी यायचे पण सावंत यांच्या काळात ध्वजारोहणासाठी मंत्री अतुल सावे यांनी हजेरी लावली. त्यातच निधी वाटपावरून सावंत यांच्या विरोधात जोरदार ओरड सुरु झाली. पालकमंत्री सावंत यांनी निधी वाटपात पक्षपाती भूमिका घेतली असून ते टक्केवारी घेवून निधी वाटतात असा जाहीर आरोप खा. संजय जाधव यांनी केला. निधी वाटपातील सावंत यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे त्यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त झाली. अजीत पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात पालकमंत्री बदलाच्या चर्चेने वेग घेतला. परभणीचे पालकमंत्रीपद आपल्या गटाकडे येईल असे पवार यांनी परभणीतल्याच आपल्या काही निष्ठावंत पदाधिकार्‍यांना सुचित केले होते.

हेही वाचा >>> कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने हसन मुश्रीफ यांचे स्वप्न अखेर साकार

गेल्या महिन्यात येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आले असतानाही पालकमंत्री सावंत हे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यांच्याविषयीची नाराजी असतानाच खुद्द सावंत यांनाही परभणीत रस नसल्याचे दिसून येत होते. अखेर सावंत यांची पालकमंत्रीपदाची सुत्रे संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात आला.सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असल्याने आणि जिल्ह्यात हा गट फारसा प्रभावी नसल्याने सावंत यांच्या पालकमंत्रीपदी असण्याचा कोणताच राजकीय फायदा महायुतीला नव्हता. याउलट परभणीच्या पालकमंत्रीपदाकडे राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाचे लक्ष होते.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या मनासारखे झाले; छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासाठी प्रतीक्षा

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. लोकसभेला सातत्याने शिवसेनेचा विजय होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच सेनेशी आजवर कडवी लढत देत आली आहे. जिल्ह्यात अजीत पवार यांच्या गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मधुसुदन केंद्रे असे काही प्रमुख समर्थक आहेत. अलीकडे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीही अजित पवार गटाशी सलगी वाढवली आहे. या सर्वांनाच बनसोडे यांच्या नियुक्तीने बळ मिळाले आहे. श्री. देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येथे क्रांती चौकात फटाके फोडून मिठाई वाटली.

संघटनात्मक बांधणीसह विकासकामांनाही गती

परभणीत पक्षाकडे खासदारकी, आमदारकी नाही मात्र कार्यकर्त्यांचे संघटन मोठे आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद भक्कमपणे वाढवण्यासाठी आपल्या गटाला पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. श्री. संजय बनसोडे यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आला असून या नियुक्तीचा जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसह विकासकामांसाठीही चांगला उपयोग होईल. प्रताप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</p>