विजय पाटील

राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या शिंदे गटातून शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदाच्या बढतीसह सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे. यातून सामुहिक नेतृत्वाचे कर्तव्य पार पाडताना शरद पवारांचा गेले चार दशके बालेकिल्ला राहिलेल्या सातारच्या सत्तेचा गड काबीज करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

शंभूराज देसाई यांच्या कॅबिनेट मंत्रीपदातून साताऱ्याच्या राजकारणात नवे राजकीय पर्व उदयास येताना निश्चितपणे सत्तेची समीकरणे बदलतील. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या कडव्या प्रस्थापितांविरुद्ध सतत टोकाचा संघर्ष करीत शंभूराज देसाई यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे. पण, आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रस्थापितांविरुद्ध नेतृत्व सिद्ध करावे लागेल.

साताऱ्याच्या राजकारणात अलीकडे भाजप व शिवसेनेला एकापाठोपाठ एक विधानसभेचे गड जिंकता आले. त्यातून आज भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद राष्ट्रवादीपेक्षा अधिकची राहिली आहे. मात्र, जिल्हा परिषद, जिल्हा बँक यासह तालुक्यांच्या मातृसंस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असून, त्याला शह देत जिल्ह्यावर भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचा भगवा फडकावण्याचे राजकीय कौशल्य शंभूराज यांना जिल्ह्याचे नेते म्हणून यापुढे दाखवावे लागेल.  

मंत्रीपद असूनही गेल्या अडीच वर्षातील देसाईंची वाटचाल तशी खडतरच राहिली. स्वपक्षीय नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून न मिळणारे महत्व, सततचे खच्चीकरण यातूनच ते एकनाथ शिंदेंच्या बंडात आघाडीवर राहिले. आजवरच्या मानापमान व राजकीय कोंडीचा वचपा काढण्याचे बळ कॅबिनेट मंत्रीपदाच्या बढतीतून शंभूराज यांना मिळाले आहे. जिल्हा बँकेतील त्यांचा पराभव आणि वेळोवेळी मिळालेल्या दुय्यम  वागणुकीचे उट्टे शंभूराज आता कसे काढतात याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशावेळी आमदार शिवेंद्रराजे, खासदार उदयनराजे या सातारच्या राजघराण्यातील आणि भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन शिंदेगटाचे आणखीएक तगडे आमदार महेश शिंदे यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीची सत्ताकेंद्रे शंभूराज यांना खेचून आणावी लागतील. शंभूराज यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई हे स्वतः एक सत्ताकेंद्र होते. तो देसाई घराण्याचा रुबाब मिळवण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षांचे ओझेही त्यांना पेलावे लागणार आहे. अशा आव्हानांचा सामना करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे याच जिल्ह्यातील असल्याने येथील विकासाची चमकही शंभूराज यांना सतत दाखवावी लागेल. एकूणच आव्हानांचा सामना आणि जनतेच्या अपेक्षांचे ओझे असे शिवधनुष्यच पेलावे लागेल अशीच त्यांची साताऱ्यातील यापुढची राजाकीय वाटचाल राहील.