पालघर : समाजमाध्यमावरून प्रसारित होणाऱ्या कशावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच पालघर मतदारसंघात चक्क उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले. नक्की काय प्रकार आहे हे संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही समजेनासे झाले. शेवटी हे पत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. पण यातून नेतेमंडळींची काही काळ चांगलीच फसगत झाली.

पालघर मतदारसंघाचा शिवसेना व भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा तिसऱ्या आठवड्यात सुटत नसताना भाजपातर्फे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचे पत्र काल रात्री समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे उमेदवारीबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली.

हेही वाचा – बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?

पालघर लोकसभेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित इच्छुक असले तरीही पालघरची जागा कोणी लढवावी यावरून महायुतीत खल सुरू आहे. भाजपच्या वतीने निवडणूक लढवावी असे गावित यांचे मते आहे. त्याचबरोबर उमेदवार बदलण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह व तर्कवितर्क पुढे येत असून शिवसेना व भाजपातर्फे अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे जागा वाटपासोबत उमेदवारीबाबतचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. पालघर लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

अशा स्थितीमध्ये सोमवारी रात्री समाजमाध्यमावर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजपाची उमेदवारी मिळाल्याचे पत्र प्रसारित झाले. त्याचा परिणाम इतका झाला की उमेदवारीसाठी दावेदार असणाऱ्या काही इच्छुकांनी त्यांच्या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व श्रेष्ठींना अनेकदा फोन करून या पत्राची सत्यता पडताळण्यास विनंती केली. तर समाजमाध्यमांवर महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीने विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील उमेदवार दिल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला.

हेही वाचा – काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले पत्र हे बनावट (फेक) असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत दोन्ही भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. पालघरच्या उमेदवारीबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावरून घोषणा करण्यात येणार असून नागरिकांनी तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी या बनावट पत्रावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.