अनिकेत साठे

राज्यसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की आणि विधान परिषद निवडणुकीत उभे ठाकलेले आव्हान, अशा कठीण परिस्थितीत शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा पुरेपूर उपयोग करण्याचे नियोजन शिवसैनिकांनी केले आहे. बुधवारी (१५ जून) सायंकाळी आदित्य यांच्या हस्ते शरयूची आरती होणार आहे. तिची जबाबदारी गोदाकाठावरील शिवसैनिकांवर आहे. पाच दिवस आधीच ते नाशिकहून अयोध्येत दाखल झाले. शरयू तिरावर फुलांच्या सजावटीपासून ते आकर्षक विद्युत रोषणाईपर्यंतची तयारी त्यांनी केली आहे.

हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्याही अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. महिनाभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज यांच्या दौऱ्यास उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध दर्शविला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना पाय ठेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. वैद्यकीय कारणास्तव राज यांना अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करावा लागला.

भाजपच्या मराठा राजकारणातून विनायक मेटे वजा?

दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मनसे आणि भाजपला शह देण्याचा सेनेचा मनुसबा होता. पण, रिंगणातून एक प्रतिस्पर्धी तूर्तास बाजूला गेला तर दुसरा म्हणजे मुख्य प्रतिस्पर्धी भाजपकडून निवडणुकीत चितपट व्हावे लागले. विधान परिषदेच्या १० जागांसाठी गुप्त मतदान पध्दतीने मतदान होणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातून राज्यसभेतील अपयशाचे मळभ दूर करण्याची धडपड सेनेकडून होत आहे.

शरयू काठावरील आरतीच्या नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे यांच्यासह काही निवडक पदाधिकारी पाच दिवसांपासून अयोध्येत ठाण मांडून आहेत. त्यांनी अनेक प्रमुख साधु-महंतांच्या भेटी घेतल्या. संपूर्ण अयोध्या नगरी तसेच लखनौ-अयोध्या मार्ग पूर्णपणे भगवामय झाल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. स्वागत फलकांनी हा परिसर व्यापला आहे. आदित्य ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेतील. नंतर त्यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता शरयूची आरती होईल. यासाठी शरयू काठावर पुष्प रचना करण्यात आली आहे. व्यासपीठ उभारून आकर्षक रोषणाईने परिसर उजळून काढण्याचे नियोजन आहे. आरतीवेळी पात्रात रंगीत दिवे सोडले जातील. फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचं ‘आस्ते कदम’, बहुमत असूनही जुळवाजुळवीचं राजकारण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या यापूर्वीच्या अयोध्या दौऱ्याची धुराही नाशिकच्या शिवसैनिकांनी पेलली होती. आदित्य यांचा दौराही यशस्वी करण्यासाठी आता त्यांनी कंबर कसली आहे. महंत शशिकांतदासजी महाराज यांच्या समवेत शिवसैनिकांनी शरयू नदीची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला. नाशिकहून रेल्वे आणि खासगी वाहनांनी शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी मनसेला शह देण्यासाठी अयोध्येत केले जाणारे शक्तीप्रदर्शन प्रत्यक्षात शिवसेनेला धक्क्यातून सावरण्यासाठी कामी येणार असल्याचे चित्र आहे.