पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता काही संपण्याचे नाव घेत नाहीये. सतत काही ना काहीतरी घडामोडी घडत आहेत. या गोष्टीला हा आठवडासुद्धा अपवाद नव्हता. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगात रवानगी झाल्याची घटना ताजी असतानाच पंजाबमध्ये एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पंजाब सरकारमधील एका जेष्ठ नेत्याला घरचा रस्ता दाखवत भगवंत मान यांनी एक मोठा झटका दिला.

शेतकरी आत्महत्यांचे केंद्र असणाऱ्या ‘मानसा’ या मतदारसंघातून विजय सिंगल हे पहिल्यांदा आमदार झाले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना अत्यंत महत्त्वाचे असणारे आरोग्य मंत्रीपद देण्यात आले. विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १० जूनपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भगवंत मान यांनी सिंगला यांच्यावर कारवाई करून आदर आणि वचक दोन्ही निर्माण केला आहे.

एकदा दुधाने तोंड पोळल्यावर ‘आप’ने आता ताकसुद्धा फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सध्या सगळ्यांचे लक्ष राज्यसभा निवडणुकांवर लागले आहे. पक्ष २ जागांवर कोणाला उमेदवारी देतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गेल्यावेळी ‘आप’ने बाहेरील लोकांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे पक्षाला खूप टीका सहन करावी लागली होती. शेवटी पक्षाने संत बलबीर सिंग सिंचेवाल आणि विक्रमजीत सिंग सहानी या दोन पद्मश्रींना उमेदवारी जाहीर केली.

पर्यावरणवादी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिंचेवाल हे राज्यातील काही मोजक्या धर्मगुरूंपैकी एक आहेत ज्यांनी समाजकार्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. पर्यावरणाची काळजी घेणे हे त्यांच्या अध्यात्माचे मूळ आहे. दोआबा परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. तर राज्यसभेसाठीचे दुसरे उमेदवार हे एक व्यवसायिक असून सन ग्रुपचे ते संस्थापक आहेत. शिक्षण तज्ञ आणि समाजसेवक ही त्यांची वेगळी ओळख आहे. ते वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशचे अध्यक्ष आहेत. सहानी यांनी गेल्यावर्षी अफगाणिस्तान मधून ५०० हून अधिक हिंदू आणि शिखांची सुटका केली होती.

सध्या सिद्धू यांना झालेला तुरुंगवास आणि स्वछतेचा आणि पारदर्शकतेचा दावा करत सत्तेत आलेल्या ‘आप’ मधील आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झालेली अटक या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे २ जागा जाहीर करताना ‘आप’ला खूप काळजी घ्यावी लागणार होती. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता ‘आप’ने सावध भूमिका घेत दोन पद्मश्री विजेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.