Tamil Nadu Vijay rally Stampede News : अभिनेता व राजकारणी थलापती विजय यांच्या गेल्या महिन्यातील तमिळनाडूच्या करूर येथील प्रचार सभेत चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत जवळपास ४१ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपाने याच मुद्द्याला हाताशी धरून राज्यात एका नव्या राजकीय समीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे. या दुर्घटनेला सत्ताधारी द्रमुक पक्ष जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या निवेदनांमध्ये विजय यांचा उल्लेख टाळल्याचे दिसून येत आहे. या घटनेआधी विजय हेदेखील आपल्या प्रचार सभांमधून सत्ताधारी द्रमुकसह भाजपाला लक्ष्य करीत होते. मात्र, आता ते पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे सांगितले जात आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुपरस्टार विजय यांच्याशी राजकीय संवाद साधण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पडद्यामागील चर्चांना सुरुवात झाली आहे. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने विजय यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. तमिळनाडूमध्ये आपला प्रभाव वाढवू पाहणाऱ्या भाजपाने पुन्हा अण्णा द्रमुकबरोबर (AIADMK) जुळवून घेतले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या असून दिल्लीतील फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र, अण्णा द्रमुकमधील फूट आणि वरिष्ठ नेते दुरावले गेल्याने हा पक्ष सत्ताधारी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात कितपत यशस्वी ठरणार याबाबत भाजपाच्या मनात सांशकता आहे, त्यामुळेच विजय यांच्याशी जवळीक साधून भाजपाकडून नवीन पर्याय शोधला जात असल्याची चर्चा आहे.

भाजपाच्या नेत्यांना नेमकी कशाची भीती?

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींशी परिचित असलेल्या भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. पूर्वी अण्णा द्रमुककडे करिश्माई नेतृत्व असल्याने ते स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उघडपणे आव्हान देत होते, पण आता पक्षात फूट पडल्याने त्यांच्याकडे कोणताही लोकप्रिय नेता नाही.” तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, आगामी निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या मताधिक्यात घट झाल्यास विजय यांचा तमिलगा वेत्री कझगम पक्ष हा सत्ताधाऱ्यांना पर्याय ठरू शकतो. विजय यांचे वय ही त्यांची एक मोठी ताकद असून पुढील अनेक दशके ते तमिळनाडूतील राजकारणावर प्रभाव टाकू शकतात.

आणखी वाचा : ‘राहुल गांधी प्रभू श्रीरामाच्या रुपात’, काँग्रेसच्या बॅनरमुळं नवा वाद; ‘राम द्रोह’ असल्याचा भाजपाचा आरोप

तमिळनाडूतील भाजपाचे राजकारण

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ करूर येथे धाव घेतली होती. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हेदेखील त्यांच्या कुटुंबाला श्रीलंकेतच सोडून तमिळनाडूत परतले होते. विशेष म्हणजे भाजपाने सत्ताधारी द्रमुकसह इतर राजकीय पक्षांना मागे टाकत पीडितांसाठी प्रत्येकी एक लाखांची मदत जाहीर केली होती. पक्षाच्या राज्य नेतृत्वापाठोपाठ केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यादेखील दुसऱ्याच दिवशी करूरमध्ये दाखल झाल्या होत्या. या घनटेनंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एक समिती घटनास्थळी पाठवली. त्यामध्ये खासदार हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांचा समावेश होता.

करूरमध्ये झालेल्या घटनेनंतर भाजपाच्या सर्वच नेत्यांनी द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरले. काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी विजय यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा सल्लाही दिला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तमिलगा वेत्री कझगम पक्षातील अनेक कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. विशेष म्हणजे विजय यांच्या विरोधात कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही, कारण त्यांच्यावर कारवाई केल्यास सरकारला मोठा विरोध होण्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे.

विजय यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार?

दरम्यान, तमिलगा वेत्री कझगम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्यास उत्सुक नसल्याचे विजय यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिल्लीतील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने विजय यांना फोन केल्याचे त्यांनी मान्य केले. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे विजय यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले, त्यामुळे तमिलगा वेत्री कझगम पक्ष हा भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा हवेतच विरत आहेत.

हेही वाचा : Top Political News : रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान; जरांगेंचा मुंडेंना इशारा, फडणवीसांकडून ठाकरेंची खिल्ली; दिवसभरातील ५ घडामोडी

शिष्टमंडळ गुजरातला का पाठवले नाही? द्रमुकचा सवाल

शुक्रवारी द्रमुकचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवरून भाजपावर तीव्र टीका केली. “करूर येथील दुर्घटनेतील पीडितांबाबत भाजपासह केंद्र सरकारला कोणतीही कळकळ नाही. ते फक्त आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असा आरोप स्टॅलिन यांनी केला. “मणिपूर येथील हिंसाचार, गुजरातमधील मोरबी पूल कोसळल्याची दुर्घटना आणि उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी घटनेनंतर भाजपाने तिथे आपल्या खासदारांचे शिष्टमंडळ का पाठवले नाही?”, असा प्रश्नही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला. तुम्ही कितीही राजकीय कुरघोड्या करा, जनता तुम्हाला तमिळनाडूच्या सत्तेबाहेरच ठेवेल, असा टोलाही स्टॅलिन यांनी भाजपाला लगावला.

तमिळनाडूत भगव्याची संधी किती?

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपासाठी तमिळनाडूसारखे मोठे राज्य आव्हानात्मक ठरतेय, कारण भाषा आणि लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून स्टॅलिन यांनी केंद्र सरकार विरोधात आघाडीच उघडली आहे. द्रमुकच्या नेतृत्वात काँग्रेस-डावे पक्ष तसेच काही दलित संघटना व मुस्लीम लीग अशी सामाजिकदृष्ट्या भक्कम आघाडी आहे. अशा वेळी राज्यात एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून स्थापित होण्यासाठी भाजपाला मित्रपक्षाची गरज आहे. अण्णा द्रमुक हा राज्यातील द्रमुकचा परंपरागत विरोधक असला तरी त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही, त्यामुळे विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षाबरोबर हातमिळवणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसतेय. हे प्रयत्न नेमके कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.