हर्षद कशाळकर

आमदारांचा विरोध-विनवण्यांकडे साफ दुर्लक्ष करत मार्च महिन्यात शिवसेनेचे युवराज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी रायगडमध्ये शिवसेना आमदारांना त्रास देणाऱ्या तटकरे यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतले खरे पण याच कृतीने आमदार-आदित्य संबंधांमध्ये कटुता वाढली आणि रायगड जिल्ह्यात शिवसेनेत बंडखोरीचे बीज रोवले गेले. नव्या पक्षनेतृत्वाकडे आमदारांच्या भावनांना काडीचीही किंमत नसल्याची आणि कार्यकर्त्यांसमोर अपमानाची भावना निर्माण होऊन याच रागातून शिवसेनेचे तिन्ही आमदार बंडात सहभागी झाले. 

गेली अडीच वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्ह्यात सातत्याने कुरबुरी होत होत्या. करोना टाळेबंदी लागल्यावर पहिल्या तीन महिन्यांतच पालकमंत्री आदिती तटकरे आणि त्यांचे पिता खासदार सुनील तटकरे शिवसेनेला त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आमदार भरत गोगावले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोघांना एकत्र भेटीसाठी बोलावत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. मात्र या कुरबुरींवर तोडगा निघू शकला नव्हता. 

त्यामुळे रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा असावा अशी मागणी सातत्याने आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी करत होते. विकासकामांसाठी निधी मिळत नाही, आमदारांचे श्रेयही पालकमंत्री घेतात अशा तक्रारी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केल्या होत्या. मात्र पक्षनेतृत्वाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पालकमंत्री बदलण्याची मागणीही फेटाळून लावली होती. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर पक्षनेतृत्वाबाबत नाराजी निर्माण होत गेली.   

शिवसेनेचे युवराज व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मार्च महिन्यात कोकण दौऱ्यावर आले होते.  या दौऱ्यात माणगाव येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेची सभा घेऊन तटकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न रायगडमधील शिवसेना आमदारांचा आणि पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा होता.  या मेळाव्यात तिन्ही शिवसेना आमदारांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर लावला होता. आमदारांच्या असंतोषाची दखल घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्याऐवजी हे व्यासपीठ तक्रारी करण्याचे नाही म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्याकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर एक प्रकारे आपल्याच पक्षाच्या आमदारांचा अवमान केला होता. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे हे तटकरे यांच्या घरी भोजनाला जाणार असल्याची कुणकुण स्थानिक पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आदित्य यांना आज तटकरे यांच्याकडे जाऊ नका संघटनेत चुकीचा संदेश जाईल अशी विनंती केली होती. वाटल्यास पुढच्या दौर्‍यात जा पण आज जाऊ नका, असे सांगितले. मात्र आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला न जुमानता  आदित्य ठाकरे हे तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग निवासस्थानी गेले. यावेळी परिवहनमंत्री अनिल परबही त्यांच्यासोबत  होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे यांनी तटकरे यांच्या घरी घेतलेला हा पाहुणचार पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याचे जाहीर पडसाद समाजमाध्यमांवर उमटले होते. याच दौऱ्यानंतर तिन्ह आमदारांच्या मनातील असंतोषाचा स्फोट झाला आणि  बंडखोरीची बिजे रोवली गेली होती. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे निमित्त साधत  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार सहभागी झाले ते त्यामुळेच अशी उघड चर्चा रायगडमधील शिवसेनेत सुरू आहे.