सतीश कामत

रत्नागिरी : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील सत्तांतरामुळे होत असलेली पडझड रोखण्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम व त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम या शिंदे गटातील नेत्यांची स्थानिक पाळेमुळे आणि सत्तेचा आशीर्वाद ही राजकीय आव्हाने लक्षात घेता रत्नागिरीतील शिवसेनेची पडझड रोखण्यात आदित्य ठाकरे यशस्वी होणार का यावर पुढील लोकसभा आणि विधानसभेची समीकरणे ठरणार आहेत.

हेही वाचा… दिल्लीतील बदल पुण्यातही करण्याचा ‘आप’ला विश्वास

शिवसेनेतील आमदार-खासदार आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडला. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यात राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये झंझावाती दौरे करून निष्ठावंतांचे मेळावे घेतले. या दौऱ्यांमध्ये कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होता. पण रत्नागिरी जिल्हा मागे ठेवण्यात आला होता. आता येत्या शुक्रवारी (१६ सप्टेंबर) आदित्य येथे येत असल्याची घोषणा पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी केली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता आदित्य रत्नागिरी शहरात येणार असून येथे त्यांची ‘संवाद निष्ठा सभा’ होणार आहे. त्यानंतर ते रस्त्याने चिपळूणला जाणार आहेत. तेथे त्यांची जाहीर सभा नसली तरी रत्नागिरी ते चिपळूण या सुमारे ९० किलोमीटरच्या प्रवासात जागोजागी शिवसेनेच्या स्थानिक शाखांतर्फे स्वागताचे कार्यक्रम अपरिहार्यपणे होणार आहेत. चिपळूण-खेडमार्गे दुपारी साडेचार वाजता आदित्य दापोलीला पोहोचणार असून तेथे त्यांची सभा होणार आहे.

हेही वाचा…गोव्यातील पक्षांतराची तीन दशकांची परंपरा कायम

कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेत बंड होण्यापूर्वी पक्षासाठी सर्वांत बलवान जिल्हा होता. जिल्ह्यातील ५ पैकी ४ आमदार, खासदार, जिल्हा परिषद-पंचायत समित्या, रत्नागिरी नगर परिषद अशा सर्व सत्ता केंद्रांवर पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. पण पक्षाचे वजनदार नेते, सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात उद्योग मंत्री असलेले उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम यांचे खेड-दापोली मतदारसंघातून निवडून आलेले आमदारपुत्र योगेश कदम आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे तिघेजण शिंदे गटामध्ये सामील झाल्याने या वर्चस्वाला मोठे धक्के बसले आहेत. विशेषतः, सामंत यांच्या जाण्याने जिल्हा परिषद, नगर परिषदेतील बळही जास्त घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, गेली सुमारे चार दशके शिवसेनेबरोबर राहिलेले रामदास कदम अतिशय दुखावलेले असल्याने जिल्ह्याच्या उत्तर भागातसुध्दा पक्षाची पकड ढिली होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीमध्ये आमदार साळवी, गुहागर-चिपळूण पट्ट्यात आक्रमक शैलीचे पक्षनेते आमदार भास्कर जाधव आणि दापोलीत माजी आमदार सूर्यकांत दळवी पक्षाची खिंड लढवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या तिघांबरोबर स्थानिक खासदार विनायक राऊत यांनीही लक्ष घातले आहे.

हेही वााचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थात या तीन मतदारसंघांमध्ये शिवसेनेला अजून फार मोठी गळती लागली नसली तरी त्याबाबतचे खरे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामध्येही अन्य दोघांपेक्षा सामंत यांची ‘तोडफोड’ क्षमता जास्त प्रभावी ठरेल, असा अंदाज आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्याचा प्रारंभ सामंतांच्या मतदारसंघातून, तर सांगता कदमांच्या मतदारसंघात (सदानंद चव्हाणांचा चिपळूण मतदारसंघमार्गे) होणार आहे. स्वाभाविकपणे या तिन्ही ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. पण आगामी निवडणुकांमध्ये ही शक्ती टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. त्या दृष्टीने आदित्य ठाकरे या दौऱ्याद्वारे पक्षकार्यकर्त्यांचे मनोधैर्य कशा प्रकारे उंचावतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.