अविनाश कवठेकर

पंजाब विधानसभेतील दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. सर्वसामान्य पुणेकरांकडून विकासाच्या ‘दिल्ली मॉडेल’ला आणि प्रामाणिक राजकारणाला प्रतिसाद दिला जाईल, अशी अपेक्षा आप पदाधिकाऱ्यांना आहे. प्रभाग पातळीवर कोपरा सभा, गृहभेटी या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचे काम आपकडून सुरू झाले आहे. निवडणूक मेळावे आणि सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच आता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि राज्यसभेतील गटनेता, खासदार संजयसिंह यांच्या शुक्रवारी होणाऱ्या जाहीर सभेची आप कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

हेही वाचा… गोव्यातील पक्षांतराची तीन दशकांची परंपरा कायम

जे दिल्लीत झाले तो बदल पुण्यातही शक्य अशी घोषणा देत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे सक्रिय काम सुरू झाले आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने पक्षबांधणीचे तसेच जनतेमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपकडून करण्यात येत आहे. केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंंगमंदिर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करून आपने पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली होती. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता, खासदार संजयसिंह यांची गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे.

हेही वाचा… पुणे महापालिकेच्या शिवसेनेच्या जागांवरून शिंदे गट-भाजपमध्ये रस्सीखेच

पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि ती केवळ आम आदमी पक्षाकडेच आहे. आम आदमी पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर दिल्ली बदलवून दाखविली. पंजाबमध्येही बदल होत आहे. महाराष्ट्र आणि पुण्यातही हा बदल शक्य आहे, असे आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या परिवर्तनासाठी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, यावर जाहीर सभेत संजयसिंह भाष्य करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… आरोप-प्रत्यारोपांच्या चक्रव्यूहात राणा दाम्पत्याची कोंडी

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी ‘मेक इंडिया नंबर वन मिशन’ ची सुरुवात केली असून यामध्ये सर्वांना आरोग्यसेवा, शिक्षण, बेरोजगारांना रोजगार, महिलांना समानता आणि सुरक्षिततेची हमी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव या पाच राष्ट्रीय उद्दिष्टांचा समावेश पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेसचा ‘परिवारवाद’, भाजपचा ‘दोस्तवाद’ याला पर्याय म्हणून आम आदमी पक्षाचा भारतवाद कसा असेल, याची मांडणीही सिंह करणार असल्याचे आपचे राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि शहर प्रवक्ता डाॅ. अभिजीत मोरे यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्यांचा उहापोह करून पक्षाचे मिशन महापालिका काय असणार हे जाहीर सभेनंतर स्पष्ट होणार आहे. अरविंद केजरीवाल यांची कामे पुण्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा. जो बदल दिल्लीत झाला, तो पुण्यातही शक्य आहे आणि त्यासाठी सज्ज राहावे, अशी साद पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाचे दिल्ली मॉडेल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून ‘संधी द्या, सुविधा घ्या’ अशी रणनीती आपने ठेवली आहे. ही रणनीतीचा आम आदमी पक्षाला महापालिकाला निवडणुकीत किती फायदेशीर ठरणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.