कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापैकी विनेश फोगटची उमेदवारी काँग्रेसनं जुलाना विधानसभा मतदारसंघातून जाहीर केली आहे. या दोघांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी प्रचार सुरू केला आहे. मात्र, कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या राजकारणात येण्यानं गावातील काही नागरिक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्याउलट विनेश फोगटच्या गावात तिच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे.

जुलानापासून जवळपास ६५ किलोमीटर अंतरावर असलेलं खुद्दन हे बजरंग पुनियाचं गाव आहे. या गावात बजरंग पुनियाचं वडिलोपार्जित घर आहे. तसेच त्यानं कुस्तीचे प्राथमिक धडेही याच गावात गिरवले आहेत. अशातच पुनियाच्या वडिलोपार्जित घरासमोरच भाजपाचे बादली येथील उमेदवार तथा हरियाणाचे माजी मंत्री ओम प्रकाश धनखड यांचं मोठं पोस्टर लावण्यात आलं आहे. खुद्दन हे गाव बादली विधानसभा मतदारसंघात येत असून, या गावातून काँग्रेसनं कुलदीप वत्स यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – आरक्षण आंदोलनातील तूट महिला मतपेढीतून भरुन काढण्याची भाजपची तयारी, तीन हजार लाडक्या बहिणींचे मेळावे

दरम्यान, बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशानंतर गावातील काही नागरिक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या राजकारणात येण्याने काँग्रेसच्या मताधिक्यात कोणतीही वाढ होणार नाही, असा दावा गावकऱ्यांकडून केला जातो आहे. या संदर्भात बोलताना खुद्दन गावातील ७० वर्षीय नागरिक असमाल सिंह म्हणाले, ”पुनिया तरुण आहे. त्यानं राजकारणात येण्याऐवजी गावातील आणि राज्यातील इतर कुस्तीपटूंना प्रशिक्षण द्यायला हवं.”

बादली मतदारसंघातील जवळपास ११ हजार म्हणजेच ४० टक्के लोकसंख्या जाट समाजाची आहे. तर, या मतदारसंघातील विद्यमान आमदार कुलदीप वत्स ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाचे उमेदवार व माजी मंत्री ओम प्रकाश धनखड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा एकदा कुलदीप वत्स यांना उमेदवारी दिली आहे आणि भाजपानंही ओम प्रकाश धनखड यांनाच उमेदवारी दिली आहे.

या मतदारसंघातून जाट समाज केवळ मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यामुळे काँग्रेसला मत देत असल्याचा दावा गावातील नागरिक समुंदर पहेलवान यांनी केला आहे. ते म्हणाले, ”ज्यावेळी शेतकरी आंदोलन सुरू होते, त्यावेळी गावातील नागरिकांनी त्यांना जेवण आणि इतर दैनंदिन वस्तू पुरवल्या. मात्र, ज्यावेळी बजरंग पुनिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले, तेव्हा गावकऱ्यांनी मदत केल्याचं दिसून आलं नाही. असं असलं तरी काँग्रेसनं बादली येथील प्रचारादरम्यान कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हुड्डा यांनी या गावातील प्रचारसभेदरम्यान बोलताना कुस्तीपुटूंना अद्यापही न्याय मिळाला नसल्याचे म्हटलं होतं.

हेही वाचा – तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा

बजरंग पुनियाचे अशा प्रकारे काँग्रेस पक्षात प्रवेश करणं, हे त्याच्या सहकाऱ्यांनाही आवडलेलं नाही. ”ज्यावेळी बजरंग पुनिया मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होता, त्यावेळी त्यानं गावातील कुस्तीपटूंच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती; पण त्यानं असं काहीही केलं नाही”, अशी प्रतिक्रिया कधी काळी बजरंग पुनियाबरोबर कुस्ती खेळलेल्या परमजित यानं दिली. तर ”१६ वर्षांचा असताना बजरंग पुनियानं गाव सोडलं होतं. त्यानंतर त्यानं गावात येणं कमी केलं. आता तर तो क्वचितच गावात येतो. माझ्या माहितीनुसार तो २०२१ मध्ये गावात आला होता. तेही ज्यावेळी माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी त्याचा सत्कार आयोजित केला होता”, असं स्थानिक प्रशिक्षक सुखदर्शन यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाची बाब म्हणजे बादली आणि खुद्दनपासून जवळच लाडपूर हे गाव आहे. हे गाव कुस्तीपटू विनेश फोगट हिचं वडिलोपार्जित गाव आहे. विनेश हिनंही बजरंग पुनियाबरोबच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, एकीकडे बजरंग पुनियाच्या गावात त्याच्याबद्दल नाराजी असली तरी विनेशच्या गावात तिच्याबाबत सहानुभूती असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना लाडपूर गावातील नागरिक रॉकी गेहलोत म्हणाले, ”विनेश फोगटला अपात्र ठरण्यात आल्यानंतर भारत सरकारनं काहीही केलं नाही. तसेच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातही सरकारनं कारवाई केली नाही. याउलट त्यांनी त्यांच्या मुलाला खासदारकीचं तिकीट दिलं. हा सत्तेचा गैरवापर आहे. गावात विनेश फोगटबाबत सहानुभूती आहे. ती नक्कीच या निवडणुकीत विजयी होईल.”