२०१४ पासून उत्तर प्रदेशात भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री म्हणून काम करतांना महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या सुनिल बन्सल यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करत त्यांना तीन महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. जिथे भाजपाची सत्ता नाहीये अशा पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या तीन राज्यांत पक्ष संघटनेची जबाबदारी बन्सल यांना देण्यात आली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत हा महत्वपुर्ण बदल पक्षामध्ये करण्यात आला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विजय मिळवला होता. बिहारमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे देशातील भाजपाचे गणित काहीसे का होईना बिघडले आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये आणखी एका राज्याची भर पडत पुन्हा केंद्रात सत्तेत येण्यासाठी भाजपाला आणखी जोर लावावा लागणार आहे. त्यामुळेच बुधवारी पक्ष संघटनेत नव्या नियुक्त्या जाहीर करतांना उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या हुकमी एक्क्याला – सुनिल बन्सल यांना आता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय सरचिटणीस हे महत्त्वाचे पद देत त्यांना तीन राज्यांची जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा… अंबादास दानवे : औरंगाबाद-मराठवाड्याचा शिवसेनेचा गड राखणार?

सुनिल बन्सल हे भाजपाचे उत्तर प्रदेशमधील प्रदेश संघटन मंत्री या पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर २०१४ पासून कार्यरत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून जे यश भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मिळालं आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर पडद्यामागे पक्षामध्ये सुत्र हलवणारे सुनिल बन्सल यांचा सिंहाचा वाटा आहे. उत्तर प्रदेश सारख्या अवाढव्य राज्यात पक्ष संघटना मजबूत करणे, नेमणुका करणे, निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देणे एवढंच नव्हे तर संघटनेत फेरबदलाबाबत निर्णय घेणे यामध्ये मोठी भुमिका ही सुनिल बन्सल यांची राहिली आहे.

हेही वाचा… प्रशांत किशोर : मुख्यमंत्री म्हणून फक्त नितीशकुमार स्थिर, बाकी बिहारमधील सर्व कारभार अस्थिर 

अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे बन्सल यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अप्रत्यक्षपणे शह दिल्याचे, योगी डोईजड होणार नाहीत याची काळजी घेतल्याचे म्हंटलं जात आहे. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर संघटनेत विविध लोकांना नव्या जबाबदारी देतांना, बन्सल यांना तीन महत्त्वाच्या राज्याची धुरा देत पक्ष संघटनेची सुत्रे आपल्याकडेच असल्याचं पुन्हा एकदा अमित शाह यांनी यानिमित्ताने दाखवल्याचं म्हंटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५२ वर्षांचे सुनिल बन्सल हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांशी जोडले गेलेले आहेत. नंतर संघाचे पुर्णवेळ प्रचारक राहीलेल्या बन्सल यांना अमित शाह यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये जबाबादारी दिली होती.