scorecardresearch

“सर्वात मोठा हिंदू कोण? भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या स्पर्धेमुळे रामनवमीला हिंसाचार भडकला,” काँग्रेस नेत्याचा आरोप

रामनवमीच्या शोभायात्रेनंतर हावडा येथे हिंसाचार उसळला, या हिंसाचाराला भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला.

Adhir Ranjan Chowdhury slams tmc mamta banerjee
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या निमित्ताने हावडा येथे निघालेल्या शोभायात्रेदरम्यान हिंसाचार उसळला. या हिंसाचारावरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे सरकार हिंसेसारखे दुर्दैवी प्रकार रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. अधीर रंजन चौधरी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, हावडा येथे घडलेल्या प्रकारामागे जातीय दंगली घडविण्याचा विचार दिसतो. गेल्या काही काळापासून या भागात जातीय दंगलींचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. हे प्रशासनाचे अक्षम्य अपयश आहे. रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचा मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला. शोभायात्रेच्या सुरक्षेसाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली. कर्तव्यात उदासीनता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार?

“पश्चिम बंगाल सरकार असे सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे प्रसंग रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. सत्ताधारी पक्ष आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढून एकमेकांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांनी बंगालची माफी मागायला हवी. बंगालच्या राजकीय इतिहासातील ही अभूतपूर्व अशी घटना आहे. कधीकधी मला आश्चर्य वाटते की, सर्वात मोठा हिंदू कोण आहे, हे दाखविण्यासाठी या दोन पक्षांत स्पर्धा तर नाही ना?”, अशी प्रतिक्रिया अधीर रंजन चौधरी यांनी या वेळी दिली.

हे वाचा >> VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी

रामनवमी हा पश्चिम बंगालसहित देशभरात साजरा केला जाणारा उत्सव आहे. मात्र राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी काही ठिकाणी या उत्सवाचा गैरवापर केला जात आहे. रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये गडबड होऊ शकते, अशी माहिती सरकारला आधीच प्राप्त झाली होती. तरीदेखील पश्चिम बंगाल सरकारने शोभायात्रेमध्ये झालेल्या चिथावणीखोर घोषणाबाजीकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर ऐनवेळी शोभायात्रेचा मार्गही बदलण्यात आला. हे सर्वकाही प्रशासनाच्या मदतीने सुरू होते, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला.

हे ही वाचा >> प. बंगालमध्ये तणाव कायम, पोलिसांवर दगडफेक; तीन जखमी

विरोधकांच्या एकजुटीबाबत बोलताना चौधरी म्हणाले की, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी तृणमूल काँग्रेस निरुत्साही दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारत जोडो यात्रा सुरू असताना आणि खासदारकी रद्द झाल्यानंतरही राहुल गांधी यांचा साधा उल्लेखही केला नाही. संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दिल्लीत विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येत असताना तृणमूल काँग्रेसने दूर राहणे पसंत केले. त्यांना आमच्यासोबत यायचे नाही. आता ते विरोधकांसोबत असल्याचे विधान करत आहेत. मात्र काँग्रेस राज्यातील राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधकांनी जो पाठिंबा दिला, तो पाहून आमचे हृदय भरून आले. मला वैयक्तिक पातळीवर वाटते की, ममता बॅनर्जी यांनी अशा प्रसंगात व्यक्तिगत पातळीवरील हेवेदावे बाजूला ठेवून लोकशाहीच्या विरोधात होणाऱ्या षडयंत्राचा आणि राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा एकत्र येऊन विरोध केला पाहिजे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेखही न करता ममता बॅनर्जींनी २३ मार्च रोजी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले, “हा पंतप्रधान मोदींचा नवा भारत आहे. विरोधी पक्षातील नेते हे भाजपाच्या निशाण्यावर आहेत. त्याचवेळी भाजपाने मात्र गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी फक्त भाषण दिले म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यात येत आहे. आज संवैधानिक लोकशाहीचा उतरता काळ आपण पाहत आहोत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 19:44 IST

संबंधित बातम्या