अमरावती : जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या निवडणुकीची रंगीत तालीम म्‍हणून ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्‍यांचे लक्ष जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे. काँग्रेससमोर जिल्‍हा परिषदेतील सत्‍ता टिकवून ठेवण्‍याचे आव्‍हान आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी; केंद्र-राज्यातील सत्ता, आयाराम या घटकांमुळे यश

यावेळच्‍या ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला असला, तरी काँग्रेसचा वरचष्‍मा दिसून आला आहे. अमरावती जिल्‍ह्याच्‍या राजकीय सारीपाटावर काँग्रेस विरूद्ध भाजप हा संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेच्‍या उद्धव ठाकरे गटाच्‍या तुलनेत शिंदे गटाची शक्‍ती क्षीण असली, तरी इच्‍छूकांना पर्याय उपलब्‍ध झाला आहे. सोबतच जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांना कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा- मोफत धान्य योजनेतून भाजपाची लोकसभा निवडणुकीची तयारी

गेल्‍या निवडणुकीत जिल्‍हा परिषदेच्‍या ५९ जागांपैकी २६ जागा काँग्रेसने जिंकून शिवसेनेच्‍या मदतीने सत्‍ता स्‍थापन केली होती. हा प्रयोग अमरावतीत नवा नसला, तरी राष्‍ट्रवादी ऐवजी काँग्रेसने शिवसेनेची साथ घ्‍यावी, याची चर्चा रंगली होती. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३० ही संख्‍या गाठायची होती. काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक असल्यामुळे कोणतेही तीन सदस्य सोबत घेऊन काँग्रेस सहज सत्‍तेनजीक पोहचणार हे स्‍पष्‍ट होते. याचवेळी अनेक वर्षे काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे पाच सदस्य असल्यामुळे यांच्यात आघाडी होईल, असा अनेकांना अंदाज होता. मात्र राष्ट्रवादीच्या या पाच सदस्यांमध्ये दोन गट पडले. यात काँग्रेससोबत राष्ट्रवादीचे दोनच सदस्य आले. सत्‍तास्‍थापनेसाठी ते पुरेसे नव्‍हते. अखेरीस शिवसेना मदतीला धावली आणि काँग्रेसची सत्‍ता स्‍थापन होऊ शकली.

हेही वाचा- हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जातंय? गेल्या दोन दिवसांत नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. राज्‍यातील महाविकास आघाडी अस्तित्‍वात असली, तरी राज्‍यात सत्‍ता राहिलेली नाही. सोबतच या आघाडीला बच्‍चू कडू आणि रवी राणा या दोन स्‍वतंत्र आमदारांशी लढत द्यावी लागणार आहे. या दोन आमदारांमध्‍ये सख्‍य नसले, तरी ते सत्‍तारूढ आघाडीत आहेत. दोघांनाही पक्षविस्‍ताराचे वेध लागले आहेत. बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे जिल्‍ह्यात दोन आमदार आहेत. रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाला स्‍थानिक निवडणुकांमध्‍ये फारसे यश मिळाले नाही. पण, खासदार नवनीत राणा यांच्‍या प्रभावाचा लाभ घेऊन जिल्‍ह्यात जनाधार वाढविण्‍याच्‍या प्रयत्‍नात युवा स्‍वाभिमान पक्ष आहे. अन्‍य एक आमदार देवेंद्र भुयार हे राष्‍ट्रवादीच्‍या वाटेवर आहेत. त्‍यामुळे राष्‍ट्रवादीला बळ मिळाले आहे. भाजपचा जिल्‍ह्यात एकच आमदार आहे, हे शल्‍य भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना आहे. त्‍यामुळेच राज्‍यसभा आणि विधानपरिषदेवर जिल्‍ह्यातील दोन नेत्‍यांना पाठवून भाजपने पक्षाला बळ देण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे. काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके या दोन प्रमुख नेत्‍यांकडे महाविकास आघाडीची धुरा आहे. ते या निवडणुकीची मोर्चेबांधणी करतात, याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.