अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मात्र जिल्हाध्यक्ष पदावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून हे पद रिक्त आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष लागोपाठ काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. गेल्या अडीच वर्षांत चौघांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे.
काँग्रेसच्या ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला. त्यांनी अन्य कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यापूर्वी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर माजी महापौर दीप चव्हाण यांची नियुक्ती होत नाही तोच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी राजीनामा दिला. दीप चव्हाण यांच्या पूर्वीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाला राम राम ठोकला.
जिल्ह्यात सध्या पक्षाची भिस्त माजी मंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्यानंतर ते संगमनेर तालुक्यातच अडकून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हाध्यक्ष पदावर ते कोणाची नियुक्ती करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे सक्रिय असताना विखे व थोरात हे दोन स्वतंत्र गट अस्तित्वात होते. त्या वेळी गटबाजीच्या माध्यमातून पक्ष जिल्ह्यात सक्रिय होता. विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर थोरात यांचे जिल्हा संघटनेवर एकहाती वर्चस्व निर्माण झाले. मात्र जिल्हाध्यक्ष लागोपाठ सोडचिठ्ठी देऊ लागल्याने पक्ष संघटनेवर परिणाम झाला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह जिल्ह्यातील १२ पालिकांच्या निवडणुकीचे वेध सध्या लागलेले आहेत. महापालिकेचे कार्यक्षेत्रवगळता ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या क्षेत्रात उर्वरित जिल्ह्याचा समावेश आहे. असे असताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. जिल्हाध्यक्षपदी जयंत वाघ कार्यरत असताना, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी थोरात व वाघ यांनी जिल्हा दौरे सुरू केले होते. मात्र ते अर्धवट पडल्याने इतर पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या रेंगाळल्या आहेत.
अडीच वर्षांत चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
जयंत वाघ यांची दीड वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांनी नियुक्ती केली होती. त्यापूर्वी श्रीगोंदा येथील साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, त्यांनी सहा महिन्यांतच स्वतःसह पत्नी तथा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. त्यापूर्वी काही दिवसांसाठी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही राजीनामा दिला. त्यापूर्वी बाळासाहेब साळुंखे सलग चार वर्षे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, त्यांनी थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून केलेल्या बंडखोरीस पाठिंबा देत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत चार जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.