अकोले: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील आयाराम- गयारामची सुरवात अकोल्यापासून झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुनीता भांगरे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने भाजपपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे गटाला जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी उमेदवार मिळाला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) व माजी आमदार वैभव पिचड (भाजप) या आजी-माजी आमदारांच्या महत्त्वकांक्षांवर याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.
सुनीता भांगरे यांनी प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा अध्यक्ष अमित भांगरे यांनी तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेला नाही. आई एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात सक्रिय अशी स्थिती दिसणार आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. याच प्रवर्गातील तसेच दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जातात. भांगरे घराण्याचे अनेक वर्षांपासून विखे परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर झाले तेव्हाच सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
माजी मंत्री मधुकरराव पिचड व सुनीता भांगरे यांचे पती दिवंगत अशोक भांगरे यांचा राजकीय संघर्ष तिस वर्षे सुरू होता. डॉ. किरण लहामटे यांचा उदय व राष्ट्रवादी मधील फुटीनंतर अकोल्यातील हा राजकीय संघर्ष पिचड-भांगरे-लहामटे असा त्रिकोणी झाला. मागील विधानसभा निवडणुकीत अमित भांगरे, डॉ. किरण लहामटे व वैभव पिचड अशीच तिरंगी लढत झाली होती. आताही अध्यक्ष पदाच्या आरक्षणामुळे तीनही घराण्यांच्या अध्यक्ष पदाच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत.
जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचाच होईल आणि तो अकोले तालुक्यातीलच असेल असे आमदार लहामटे यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. राज्यात महायुती असली तरी अकोले विधान सभा मतदारसंघाप्रमाणेच आमदार लहामटे यांची भूमिका एकला चलो अशीच असणार आहे. त्यामुळे सुनीता भांगरे यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग रोखण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे वैभव पिचड यांची कन्या डॉ. मधुरा हिचे नावही निवडणुकीसाठी चर्चेत आहे. मात्र विखे यांचा सुनीता भांगरे यांच्याकडे असणारा कल पहाता पिचड यांनाही महत्वाकांक्षेला मुरड घालावी लागेल असे दिसते. त्यांचे कार्यकर्ते ही बाब स्वीकारतील का ? पक्षश्रेष्ठी हा पेच कसा सोडविणार?, की पिचड यांचे वेगळ्या पद्धतीने पुनर्वसन करणार? शिवाय अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर पिचड-भांगरे गट आदिवासी भागात एकत्र येत आहेत. गावपातळीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार की नाही ही बाबही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
अमित भांगरे यांची निवडणुकीबाबत काय भूमिका असेल? महाविकास आघाडीचा अकोल्यात तेच चेहरा आहेत. आईविरुद्ध ते भूमिका घेऊ शकणार नाहीत. पण अन्य गटात त्यांची भूमिका काय असेल. पूर्वीप्रमाणेच ते आक्रमक भूमिका घेऊ शकतील का?, की त्यांचे लक्ष फक्त आमदार लहामटे असेल. एकंदरीत अध्यक्ष पदाचे आरक्षण, त्यासाठी तीन प्रमुख राजकारणी दावेदार असणे, यामुळे अकोल्यातील जिल्हा परिषद निवडणूक यावर्षी चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
