Air India Ahmedabad plane crash अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी दुपारी २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असे सांगितले जात होते, मात्र आता एक प्रवासी बचावल्याचीही माहिती समोर येत आहे. प्रवाश्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश होता. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झाला आहे. आजवर विमान अपघात अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे, ते नेते कोण? जाणून घेऊयात… विजय रुपाणी १२ जून २०२५ रोजी दुपारी १.३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे एआय १७१ विमान मेघानी नगरमधील एका निवासी भागात कोसळले. उड्डाणानंतर सुमारे पाच मिनिटांनी हा अपघात झाला. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल होते, तर क्लाइव्ह कुंदर हे सह-वैमानिक होते. विमानात २३० प्रौढ नागरिक आणि दोन बालकांसह १२ क्रू सदस्यांचा समावेश होता. ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांचे या अपघातात दुःखद निधन झाले.

संजय गांधी
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी तरुण वयात निधन झाले. दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर संजय गांधी विमान चालवत असताना ही दुःखद घटना घडली. हवेमध्ये विमानाच्या कसरती करण्याची त्यांना आवड होती. इंदिरा गांधी यांच्या अनेक निर्णयांमध्ये, तसेच काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.
वाय.एस. राजशेखर रेड्डी
३ सप्टेंबर २००९ रोजी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाले. वाय. एस. राजशेखर रेड्डी चित्तूर जिल्ह्यातील एका गावाकडे जात असताना हा अपघात घडला.
जी.एम.सी. बालयोगी
तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि लोकसभा अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी अपघातात निधन झाले. त्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोल्लेरू क्रेगियनमधील कोव्वादलंका गावात आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
दोरजी खांडू
३० एप्रिल २०११ रोजी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर दाट जंगली भागात कोसळले आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झालं. हे हेलिकॉप्टर तवांगहून निघाले होते आणि इटानगरच्या दिशेने जात होते. उड्डाणाच्या सुमारे २० मिनिटांतच समुद्रसपाटीपासून सुमारे १३,००० फूट उंचीवर असलेल्या सेला खिंडीजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला.
माधवराव सिंधिया
३० सप्टेंबर २००१ रोजी काँग्रेसचे प्रमुख नेते माधवराव सिंधिया यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. सेसना विमान उत्तर प्रदेशातील कानपूरला जात असताना हावे येथून पुढे गेले. उड्डाणादरम्यान, विमानातील वैमानिकाचा दिल्लीतील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला आणि पुढे लखनऊमधील एटीसीशीदेखील संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
ओ.पी. जिंदाल
उद्योगपती आणि हरयाणा येथील मंत्री ओ. पी. जिंदाल यांचे २००५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ३१ मार्च २००५ रोजी ओ.पी. जिंदाल आणि त्याच सरकारचे कृषी मंत्री सुरेंद्र सिंह हे चंदीगडहून दिल्लीला हेलिकॉप्टरने रवाना झाले. उत्तर प्रदेशातील सहारनपूरजवळ त्यांचे हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतात कोसळले. या अपघातात जिंदाल आणि सुरेंद्र सिंह यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण अपघातातून बचावले.
सुरेंद्र सिंह
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुरेंद्र सिंह यांचे १९९५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.