नागपूर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जरी जाहीर झाली नसली ,तरी सर्व प्रमुख पक्षांनी त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती तर यात अग्रस्थानी आहे, ही निवडणूक एकत्र लढणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी , बलस्थान असलेल्या शहरात हे तीनही पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत आहेत.
भाजपसाठी नागपूर तर अजित पवार यांच्यासाठी पुणे महापालिका महत्वाची आहे. महायुती झाली तर जास्तीत जास्त जागा पदरी पडाव्या म्हणून आत्तापासूनच डावपेच आखले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या, नागपुरात १९ सप्टेबरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर आयोजित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा शिबिराचा महत्वाचा उद्देश आहे.
लोकसभा निवडणुकीत विदर्भात एकही जागा न लढवणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाला विधानसभेत मात्र आश्चर्यकारकरित्या सहा जागा मिळाल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा विस्तार करण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे, त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे चिंतन शिबीर नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी हा ग्रामीण भागावर जोर देणारा पक्ष असला तरी नागपूर महापालिकाही त्यांच्या अजेंड्यावर आहेच. येथे पक्षाची स्थिती जेमतेम आहे, त्यात प्राण पुंकण्याचा प्रयत्न चिंतन शिबिराच्या माध्यमातून केला जाऊ शकतो.
शिबीर नागपुरात का ?
बरखास्त महापालिकेत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा ऐकमेव नगरसेवक होता. तो सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेतली तर अजित पवार गट शुन्य आहे. राष्ट्रवादीची नागपुरातील नगण्य ताकद लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्ष त्यांना सोबत घेण्याच्या मनस्थितीत नाही. महायुती म्हणून सर्व महापालिका लढण्याचा निर्णय झालाच तर माजी नगरसेवकांच्या संख्येचा आधार घेतला जाईल. तसे झाल्यास राष्ट्रवादीला एक जागा मिळेल.
पण राष्ट्रवादीने चाळीस जागांची मागणी केली आहे. मित्रपक्षाने पांघरुण पाहून पाय पसरावे, असा सल्ला भाजपने राष्ट्रवादीला या पूर्वीच दिला आहे. त्यामुळे भाजपशी सन्मानकारक वाटाघाटी करायच्या असेल तर राष्ट्रवादीला ताकद दाखवावी लागेल. चिंतन शिबिरातून राष्ट्रवादी हीच ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे महापालिकेची निवडणूकही राष्ट्रवादीसाठी तेवढीच महत्वाची आहे. नागपूर प्रमाणे तेथेही भाजपची सत्ता होती. पण नागपूरच्या तुलनेत पुण्यात राष्ट्रवादी भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे नागपूरच्या बदल्यात पुण्यात जास्त जागा पदरी पाडण्यासाठी राष्ट्रवादी चिंतनशिबिराच्या माध्यमातून दबाव निर्माण करू शकते. त्यामुळे नागपूरचे शिबीर अनेक अर्थाने महत्वाचे आहे.
पवारांचा दौरा अन् खांदेपालट
एक महिन्यापूर्वी नागपूरमध्ये अजित पवार यांचा दौरा झाला होता. यावेळी तत्कालीन शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पक्ष सत्तेत असूनही कामे होत नाही, असा तक्रारींचा सूर लावला होता. त्याची दखल घेण्याऐवजी पवार यांनी अध्यक्षांचीच उचलबांगडी केली होती. त्याचा चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. त्याचा उद्रेक चिंतन शिबिरात होतो का ? याकडेही राजकीय वर्तुळांचे लक्ष असणार आहे