नागपूर: महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षाने नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असताना दुसरीकडे बरखास्त महापालिकेत केवळ एक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने (अजितपवार) आगामी ४० जागांची मागणी केली आहे. भाजपने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी अपवादात्मक शहरे वगळता महायुती एकत्र लढेल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भाजप नागपुरात तरी मित्र पक्षाला भीक घालणार नाही हे स्पष्ट करणारे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला दिल्यावर सर्वात आधी भाजपने निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली. नागपूर हे शहर तर भाजपचा बालेकिल्ला. महापालिकेवर१५ वर्ष सत्ता याच पक्षाची सत्ता होती. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. पक्षाची सध्याची ताकद लक्षात घेतली तर ते मित्रपक्षाला सोबत घेण्याची सुतराम शक्यताच नाही.

पक्षाच्या आमदारांकडून स्वबळाची भाषा जाहीरपणे करणे सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कँग्रेसने (अजित पवार) ४० जागांची केलेली मागणी महत्वाची ठरते. राष्ट्रवादीच्या शहर शाखेने तसा ठराव पारित करून पक्षश्रेष्टीकडे पाठवला आहे. १५१ जागांच्या नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची संख्या एक होती. पक्ष विभाजनानंतर ती शुन्यावर आली कारण ते नगरसेवक सध्द्धा आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेले. त्यामुळे महापालिकेत सध्या यापक्षाची पाटी कोरी आहे. त्यामुळे त्यांनी केलेली ४० जागांची मागणी अवास्तव स्वरुपाची वाटते.

युती करायचीच झाली तर महापालिकेत ज्यांच्या जितक्या जागा होत्या तेवढ्या सोडण्याची मानसिकता भाजपची आहे. हा आधार लक्षात घेतला तर राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच येणार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने भाजपवर दबाव वाढवण्यासाठी सुरूवातीलाच ४० चा आकडा जाहीर केला,अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे म्हणणे काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीची पक्षाने तयारी केली आहे. आम्ही ४० जागांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठीकडे पाठवला आहे. १५१ जागांच्या महापालिकेत ४० जागांची मागणी काही अवास्तव नाही. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार अनेक प्रभागात अत्यंत कमी मतांनी पराभूत झाले होते. त्यांची संख्या चाळीसहून अधिक आहे. त्यांना या निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे.आम्ही काँग्रेस सोबत होतो तेव्हा लोकसभा आणि विधानसभेत त्यांना मदत करीत होतो, आता भाजपसोबत आहोत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा प्रचार केला. आम्ही फक्त मित्रपक्षाचाच प्रचार करायचा का ? आमचा पक्ष कधी वाढवायचा?. राष्ट्रवादीची ताकद आता वाढली आहे. त्यामुळेच आम्ही ४० जागांची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यांनी यावर विचार करावा, त्यांनी वेगळे लढण्याचे आदेश दिले तर आमची त्यासाठीही तयारी आहे, असे प्रशांत पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचा पुर्वानुभव

भाजप नागपुरात मित्रपक्षाला कधीच मोठा होऊ देत नाही, हा पूर्वानुभव आहे. त्यांचा पूर्वीचा मित्र पक्ष शिवसेनेलाही भाजपकडून सापत्न वागणूक मिळत होती. राज्यात सेनेशी युती असली तरी नागपुरात भाजपचाच वरचष्मा होता. शिवसेनेची पूर्व व दक्षिण नागपुरात ताकद तरी होती, राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत अशी स्थिती नाही.