Latest News on Maharashtra Politics Today : मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपाच्या रडारवर असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला, तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेचा भाजपाच्या नेत्यांनी समाचार घेतला. मुंबई विकणार आणि महाराष्ट्रापासून तोडणार ही कॅसेट आता जुनी झाली असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले, तर बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनाची राज्य सरकारने धास्ती घेतल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

अजित पवार भाजपाच्या रडारवर- रोहित पवार

भारतीय जनता पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणले जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. “आपल्याच मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा इतिहास आहे. आता त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे लक्ष्य करणे सुरू केले आहे. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे आणि त्या वृत्तीचा आता शिंदे आणि पवार यांच्या पक्षांनाही फटका बसणार आहे”, असेही ते म्हणाले. “भाजपाने ऑपरेशन लोटस २.० सुरू केले असून याअंतर्गत ते हळूहळू दोन्ही पक्ष संपवण्याचा प्रयत्न करतील. २०२९ च्या निवडणुकीत आमच्याबरोबर आमचे लोक आणि आमचे विचार असतील. परंतु, या दोन पक्षांची स्थिती अवघड असेल”, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. यावेळी त्यांनी ‘भाजपाला कुबड्यांची गरज नाही’ या अमित शाह यांच्या विधानाचा दाखलाही दिला.

भाजपाच्या नेत्यांनी घेतला ठाकरेंच्या विधानाचा समाचार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही खुले आव्हान दिले. त्यांच्या या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. “केंद्रीय मंत्री अमितभाई शाह हे मुंबईत येऊन गेले याची भिती आज निर्धार “मेळाव्याच्या चेहऱ्यावर” स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते. एवढेच नवीन सोडले तर.. बाकी सगळे तेच ते आणि तेच ते.. तीच रुदाली, तेच रडणे तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या.. कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच… नाव “विजयाचा संकल्प” आणि बोलण्याला पराभवाचा दर्प”, अशी पोस्ट भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली.

आणखी वाचा : नितीश कुमार यांची ‘पलटी’ भाजपासाठी कशी ठरतेय फायदेशीर? बिहारचे समीकरण काय सांगते?

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या निर्धार मेळाव्यातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. “महापालिकेच्या निवडणुका येतात तेव्हा त्यांची ही टूम सुरू होते. मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार… ही जूनी कॅसेट झाली आहे. आता त्यांनी नवीन स्क्रिप्ट रायटर शोधला पाहिजे,” असे शिंदेंनी म्हटले आहे. “गेल्या २५ वर्षांपासून ते (उद्धव ठाकरे) मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर मोठा विळखा घालून बसले आहेत. या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळे आहे, याचे पोट भरत नाही. मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतील रुग्णांची खिचडी गिळली. मुंबईतले काही भूखंड गिळले. मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातील डांबर गिळलं तरीही त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे हा भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांचे शिंदे-पवारांना खुले आव्हान

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपावर टीका करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदेंना खुले आव्हान दिले. “देशभरात अनेक ठिकाणी भाजपा कुबड्यांवर सत्तेत आली आहे. कुबड्यांच्या मदतीवर त्यांनी पक्ष वाढवला असून, महाराष्ट्रातही दोन कुबड्या आहेत. वापर आणि फेकून द्या अशी भाजपाची नीती राहिलेली आहे. सोमवारी अमित शाह जे काही बोलले, त्याबाबत स्वाभिमान असेल तर शिंदे आणि पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावे”, असे आव्हान राऊतांनी दिले. “बाबरीनंतर आम्ही देशभरात लोकसभा निवडणूक लढवणार होतो. मात्र, अटल बिहारी वाजपेयी यांनी विनंती केली की, तुम्ही निवडणुका लढवल्या तर भाजपाचे नुकसान होईल. तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात उमेदवार मागे घेतले”, असा दावाही यावेळी संजय राऊतांनी केला.

आणखी वाचा : भाजपाने १४ वर्षांनी काढला ‘त्या’ पराभवाचा वचपा; ओमर अब्दुल्ला यांना मोठा धक्का, काश्मीरमध्ये काय घडलं?

बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. नागपुरात होणाऱ्या या आंदोलनाची राज्य सरकारने धास्ती घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आंदोलक सिव्हिल लाईन्स मध्ये शिरण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी समोर संचारबंदी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. संतप्त आंदोलक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशिमबागकडे जाऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या घडामोडीत वर्ध, चंद्रपूर आणि हैदराबादकडून येणारी आणि जाणारी सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्धा मार्गांवर ठाण मांडल्याने मिहान पुलाखाली चक्का जाम झाला आहे.