बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद याची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. रविवारी त्यांनी ही घोषणा केली. काही महिन्यांपूर्वी आकाश याला दुसऱ्यांदा पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. आकाश आनंद याचे सासरे अशोक सिद्धार्थ हे स्वतःच्या खासगी लाभांसाठी मायावतींच्या नावाचा वापर करत होते, त्यामुळे मायावतींनी आकाश आनंद यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर आकाश याने एक्सवर एक पोस्ट शेअर करत पक्षाची तसेच मायावतींची जाहीर माफी मागितली होती.

आकाश यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, “बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या, राज्यसभा आणि लोकसभेच्या अनेकवेळा खासदार बनलेल्या मायावती यांनाच मी एकमात्र राजकीय गुरू आणि आदर्श मानतो. आज मी शपथ घेतो की, बहुजन समाज पक्षाच्या हितासाठी मी सर्व नातीगोती बाजूला ठेवतो. विशेष म्हणजे माझ्या सासरच्या मंडळीना दूर ठेवून पक्षकार्यात बाधा बनू देणार नाही.”

आकाश यांनी पुढे लिहिले होते की, “एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका एक्स पोस्टबाबतही मी माफी मागतो. त्या पोस्टमुळे आदरणीय मायावती यांनी मला पक्षातून काढून टाकले होते. यापुढे राजकीय निर्णय घेताना मी कोणत्याही नातेवाईकाचा किंवा सल्लागाराचा सल्ला घेणार नाही, हे जाहीर करतो.”

महत्त्वाचं म्हणजे ज्या पदावर आकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते पद पूर्वीच्या राष्ट्रीय समन्वयक पदापेक्षा वरिष्ठ गटातले आहे. आकाश आता देशभरातली सर्व राज्य घटकांसाठी बसपाच्या रणनीतीचे प्रभारी असतील अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. आकाश याचे पुनरागमन दोन महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या राजीनाम्याइतकेच नाट्यमय असल्याचे दिसून येते.

रविवारी दिल्लीत देशभरातली बसपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मायावती आकाश याच्यासोबत कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या, तसंच मायावतींनी आकाश याला सोबत व्यासपीठावर बसण्यास सांगितले. त्यांच्यासोबत आकाश याचे वडील, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार आणि तीन राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम, रणधीर सिंह बेनीवाल आणि राजा राम हेदेखील व्यासपीठावर बसले होते. या बैठकीतील भाषणादरम्यान मायावतींनी आकाश याची बसपाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पक्षाच्या कामात आकाशला आशीर्वाद आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रत्येक राजकीय बैठकीत ते त्याच्यासोबत राहतील असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. म्हणजेच आकाश याचं फक्त पुनरागमनच झालेलं नाही तर अनेक वरिष्ठ नेत्यांना मागे टाकून पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदाचा तो मानकरी ठरला आहे.

“आकाश बसपामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर परतला आहे. गेल्या महिन्यात पक्षात प्रवेश केल्यानंतर हे अपेक्षित होतेच. आता तो त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेल्या तिन्ही राष्ट्रीय समन्वयकांपेक्षा वरच्या पदावर असेल”, असं पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं आहे. “आकाश याला नेता म्हणून तयार करण्याची आवश्यकता आहे. मायावतींनी आम्हाला आकाशने काही चूक केल्यास खासगीत सांगण्यास सांगितले आहे”, असेही पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. वरिष्ठ नेत्यांपेक्षाही आकाशची बढती झाल्याने पक्षात सध्या चर्चा सुरू आहे. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, “आकाशला त्याचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्यामुळे राजकीय धक्का बसला. मार्चमध्ये मायावतींनी आकाशला बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकले होते आणि पक्षातून बाहेर करण्याआधी त्याला राजकीय उत्तराधिकारी म्हणून बेदखलही केले होते.”

मायावतींनी आकाश याच्या वागण्यामागे त्याचे सासरे अशोक सिद्धार्थ असल्याचे सांगत, आकाश त्यांच्या प्रभावाखाली आल्याचे म्हटले. अशोक सिद्धार्थ यांनाही फेब्रुवारीमध्ये गटबाजी आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली पक्षातून काढून टाकण्यात आले होते.
एप्रिलमध्ये आकाशने पक्षाची आणि मायावतींची जाहीर माफी मागितली आणि विश्वास दिला की, “यापुढे कोणत्याही नातेवाईक किंवा सल्लागाराचा सल्ला घेणार नाही आणि फक्त आदरणीय मायावतींनी दिलेल्या निर्देशांचे पालन करेन.”

आज बी.एस.पी की आल-इंडिया बैठक में शामिल होने का मौका मिला। सभी पदाधिकारियों को पूरे देश में पार्टी को मजबूत करने के लिए आदरणीय बहन कु. मायावती जी का मार्गदर्शन और जरूरी दिशा-निर्देश मिला।
आदरणीय बहन जी ने मुझे पार्टी के मुख्य नेशनल कोआर्डिनेटर पद की जिम्मेदारी दी है।
मैं आदरणीय…

— Akash Anand (@AnandAkash_BSP) May 18, 2025

मायावतींनी आकाशची माफी स्वीकारली आणि त्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय या अटीवर घेतला की तो त्याच्या वरिष्ठांचा आदर करेल आणि त्याच्या सासऱ्यांच्या सल्ल्याला न जुमानता काम करेल. त्यावेळी मायावतींनी यावरही भर दिला की, “कोणालाही त्यांचा राजकीय वारस म्हणून नियुक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

पार्श्वभूमी काय होती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० वर्षीय आकाशला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथम बसपा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले. पक्षाच्या २०२४ च्या लोकसभा मोहिमेची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सीतापूर येथे प्रचार भाषणादरम्यान शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मायावतींनी त्याला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकले आणि उत्तराधिकारी म्हणूनही वगळले. त्यानंतर ४७ दिवसांनंतर आकाशला दुसरी संधी देण्यात आली. मायावतींनी गेल्या वर्षी जूनमध्ये त्याला राष्ट्रीय समन्वयक आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त केले. दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये आकाशला दुसऱ्यांदा राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकण्यात आले होते.