Hyderabad University Student Elections : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेने (ABVP) तब्बल सात वर्षांनंतर हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विजय मिळवला. दोन मुस्लीम संघटनांबरोबरची युती आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेबद्दलची वाढती नाराजी यांचा थेट फायदा एबीव्हीपीला फायदा झाला. विशेष बाब म्हणजे काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयला (NSUI) या निवडणुकीत नोटापेक्षा कमी मते मिळाली. याआधी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी झालेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतही एबीव्हीपीने दणदणीत विजय मिळवला होता. गेल्या आठवडाभरातील दोन मोठ्या कॅम्पसवर मिळवलेला हा त्यांचा दुसरा मोठा विजय ठरला.

एबीव्हीपीने जिंकली सर्वच महत्वाची पदे

रविवारी झालेल्या या निवडणुकीत एबीव्हीपीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संयुक्त सरचिटणीस, सांस्कृतिक सचिव व क्रीडा सचिव अशी सर्वच सहा पदे आपल्या पदरात पाडून घेतली. एबीव्हीपीच्या पॅनेलमधून शिवा पालेपु- अध्यक्ष, देवेंद्र- उपाध्यक्ष, श्रुती- महासचिव, सौरभ शुक्ला- संयुक्त सचिव, ज्वाला प्रसाद- क्रीडा सचिव, विनस- सांस्कृतिक सचिव म्हणून निवडून आले. इतकेच नव्हे, तर विद्यापीठातील इतर लहान पदेही जिंकून त्यांनी बहुमत मिळवले. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा हा निकाल अराजकता, हिंसा आणि राष्ट्रविरोधी कारवायांना खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधातला जनादेश असल्याचे एबीव्हीपीच्या सदस्यांनी सांगितले.

एबीव्हीपीचा विजय नेमका कशामुळे झाला?

“आजच्या जनरेशन-झेड विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते पोकळ घोषणा आणि विध्वंसक राजकारण नाकारतात. त्याऐवजी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक समृद्धी व राष्ट्रनिर्माणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेवर विश्वास ठेवला आहे,” असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले. हैदराबाद हा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. या विद्यापीठ विद्यार्थी संघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. यंदा मात्र आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन (ASA) आणि सीपीआयच्या (एम) विद्यार्थी संघटनेतील (SFI) वादाचा थेट फायदा एबीव्हीपीला झाला. यापूर्वी या दोन्ही संघटना ‘प्रगतिशील विद्यार्थी’ या आघाडीखाली एकत्र लढत होत्या. यावेळी त्यांच्यात झालेले मतभेद आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेबद्दल वाढलेली नाराजी यामुळे एबीव्हीपीचा विजय अधिकच सोपा झाला.

आणखी वाचा : BJP Mla Aditi Singh : काँग्रेसमधून आलेल्या आमदार अदिती भाजपाला डोईजड? कारण काय?

एबीव्हीपी संघटनेला नेमका कशाचा फायदा?

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा हा विजय अतिशय खास मानला जात आहे. कारण- गेल्या सहा वर्षांपासून विद्यापीठात डावे, दलित संघटना व काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयचा दबदबा होता. कांचा गाचीबोवली परिसरातील विद्यापीठाच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनएसयूआयबाबत नाराजी होती. या वर्षीच्या सुरुवातीला तेलंगणातील काँग्रेस सरकारने इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनमार्फत ४०० एकर जमीन विकासासाठी लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेने या आंदोलनाचा राजकीय लाभ घेतला.

एसएफआयच्या एका विद्यार्थी नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत आम्ही बेडकर स्टुडंट्स असोसिएशन (एएसए)शी युती करण्यास नकार दिला होता. कारण- त्यांनी आघाडीत दोन मुस्लीम संघटनांना सामील करण्याचा आग्रह धरला होता; पण आम्हीच तो नाकारला. आपल्या विचारसरणीशी तडजोड करून कोणत्याही मूलतत्त्ववादी संघटनेबरोबर युती करणे आम्हाला शक्य नव्हते. दरम्यान, एसएफआयचे उपाध्यक्ष जी. मोहित यांनी एबीव्हीपीच्या विजयाचे श्रेय देशात २०१४ नंतर वाढलेल्या उजव्या विचारसरणीच्या प्रभावाला दिले. “कॅम्पसमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना एबीव्हीपीने इतर संघटनांपेक्षा वेगाने आपल्याकडे खेचले. गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांचा वापर करून एबीव्हीपीने आपल्या समर्थकांना एकत्र केले,” असे ते म्हणाले.

एबीव्हीपीचे राष्ट्रीय सचिव विजयाबद्दल काय म्हणाले?

या निवडणुकीत एबीव्हीपी उमेदवारांना ४०० ते १,००० मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळाल्याने एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या कमकुवत कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एबीव्हीपीचे राष्ट्रीय सचिव श्रावण बी. राज यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “या विजयामागे एबीव्हीपीच्या ३०० कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत… कांचा गाचीबोवली येथे आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला आणि त्यांना अटक करून तुरुंगात डांबले गेले. तरीदेखील आम्ही विद्यार्थीकेंद्रित प्रचार करून राष्ट्रवादाचा मुद्दा जोरकसपणे मांडला, ज्याचा फायदा निवडणुकीत झाला.” एनएसयूआयच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “एबीव्हीपी आपल्या संघटनेवर १० वर्षांपूर्वी झालेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या आरोपांबाबत विद्यार्थ्यांना विसर पाडण्यात यशस्वी झाली.”

हेही वाचा : Sardar Patel AI Holobox : RSS वरील बंदी ते गांधींबरोबरचे संबंध, सरदार पटेलांचा होलोबॉक्स देतो क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं; नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

रोहिल वेमुला प्रकरण काय होते?

हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याने जानेवारी २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. या घटनेमुळे जातीय भेदभावाविरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहिले. वेमुला हा दलित संघटनेचा नेता होता आणि त्यावेळी एएसए-एबीव्हीपी वादामुळेच त्याने आत्महत्या केली, असा आरोप झाला होता. रोहितच्या निधनानंतर दोन वर्षे एएसए-एसएफआय आघाडीने निवडणुका जिंकल्या. मात्र, २०१८ मध्ये ही आघाडी टिकली नाही आणि एबीव्हीपीने विजय मिळवला. दरम्यान, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बांदी संजय कुमार यांनी रविवारी आपापल्या ‘एक्स’वरून पोस्ट करीत या विजयाबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेचे अभिनंदन केले. दिल्ली विद्यापीठानंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील एबीव्हीपीचा विजय हा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काम करण्याच्या संघटनेच्या समर्पणाचा पुरावा आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.