आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत लोकसभा निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीच्या तयारीसाठी देशभरातील सर्वच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षानेदेखील या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षात अनेक बदल केले आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या विभागांची कार्यकारिणी, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच अन्य महत्त्वाच्या पदांवर अखिलेश यादव यांनी नव्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी मिळावी हा यामागचा हेतू आहे.

समाजवादी पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा

गेल्या आठवड्यात समाजवादी पार्टीने आपल्या समाजवादी सांस्कृतिक प्रकोष्ठ या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत लोकगायक, संगीतकार, कवी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या या शाखेकडून वेगवेगळ्या गीतांची रचना केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी या गीतांच्या माध्यमातून समाजवादी पार्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एसटी सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूरनमासी देहाती

अखिलेश यादव यांनी पक्षाच्या अनुसूचित जमाती (एसटी) विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूरनमासी देहाती यांची निवड केली आहे. या अनुसूचित जमाती सेलच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचण्याचा समाजवादी पार्टीचा प्रयत्न आहे. अखिलेश यादव यांनी पक्षाचे छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन कुमार गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. याआधी छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी ओमप्रकाश साहू हे होते. येत्या नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये पक्षाला चालना मिळावी म्हणून हा बदल करण्यात आला आहे.

एसटी सेलच्या नव्या कार्यकारिणीची २४ ऑगस्ट रोजी घोषणा

अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या एसटी सेलच्या नव्या कार्यकारिणीची २४ ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. या नव्या कार्यकारिणीत एकूण ३२ सदस्य आहेत; तर समाजवादी शिक्षक सभा या शिक्षकांसाठी काम करणाऱ्या विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. समाजवादी शिक्षक सभेत ८४ सदस्य असून, २४ ऑगस्ट रोजी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

१३ ऑगस्ट रोजी राज्य कार्यकारिणीची घोषणा

समाजवादी पार्टीने आपल्या समाजवादी अल्पसंख्याक सभा या विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष बदलले आहेत. त्यासह पक्षाने २३ ऑगस्ट रोजी समाजवादी बाबासाहेब आंबेडकर वाहिनी या उत्तर प्रदेशमधील दलितांसाठी काम करणाऱ्या विभागाच्या जिल्हा अध्यक्षांचीही नव्याने नियुक्ती केली आहे. १३ ऑगस्ट रोजी पक्षाने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांच्या नेतृत्वाखाली नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या कार्यकारिणीत यादव समाज वगळता अन्य ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीचा २२ ऑगस्ट रोजी विस्तार करण्यात आला होता. या विस्तारांतर्गत आणखी काही नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.

जुलै महिन्यात राज्य, राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त

गेल्या महिन्यात समाजवादी पक्षाने समाजवादी सैनिक सेल या आपल्या एका विभागाची पुनर्रचना केली होती. २९ ऑगस्ट रोजी समाजवादी पार्टीने आपल्या मुलायमसिंह यादव युथ ब्रिगेड या आणखी एका विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना केली होती. या विभागांतर्गत पक्षाने वेगवेगळ्या राज्यप्रमुखांची नियुक्ती केली. गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात समाजवादी पक्षाचा विधानसभा, लोकसभा या दोन्ही निवडणुकांत पराभव झाला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय, राज्य, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात महत्त्वाचे बदल : चौधरी

समाजवादी पक्षात केल्या जात असलेल्या या बदलांसदर्भात पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षातील वेगवेगळ्या पदांवरील नियुक्त्या बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या. सध्या निवडणुका जवळ येत आहेत. याच कारणामुळे या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात पक्षाच्या वेगवेगळ्या संस्था आणि विभागांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे सर्व बदल केले जात आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.