राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. आता काँग्रेसह इतर विरोधी पक्ष तसेच भापजाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया आघाडी’च्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत एकूण २८ घटकपक्ष असून नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे आहे. दरम्यान, तीन राज्यांत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे काँग्रेसचे विरोधकांमधील वजन तसेच जागावाटपसाठीची ताकद यामध्ये बदल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यांच्या टिप्पणीमुळे इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

घटकपक्षांकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येत्या ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला येऊ शकणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी कळवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र आले असले तरी त्यांच्यात अद्याप जागावाटप झालेले नाही. लवकरात लवकर जागावाटप करावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच इतर पक्षांची होती. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकीनंतरच जागावाटपावर चर्चा घडवून आणण्याची भूमिका काँग्रेसची होती. पाचपैकी काही राज्यांत विजय झाल्यास अधिक जागांवर दावा करता येईल, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. मात्र तीन महत्त्वाच्या राज्यांत पराभव झाल्यामुळे काँग्रेसचे हे नियोजन फसले आहे. या अपयशानंतर आता इंडिया आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपल्यालाच जास्तीत जास्त जागा कशा मिळतील, याचा हे घटकपक्ष प्रयत्न करतील. त्याचाच एक भाग म्हणून आता ममता बॅनर्जी यांनी मी बैठकीला येऊ शकणार नाही, असे सांगितले आहे. तसेच अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले?

वाराणसीमध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच समाजवादी पार्टीची आगामी वाटचाल कशी असेल, याबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. “आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून अहंकारही संपला आहे. आगामी दिवसांत आपल्याला एक नवा मार्ग सापडेल,” असे अखिलेश यादव म्हणाले. “उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला मोठी लढाई लढावी लागणार असून त्यासाठी काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. ज्या ठिकाणी एखादा पक्ष मजबूत असेल, त्या ठिकाणी अन्य पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे,” असेही अखिलेश यादव म्हणाले.

“मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा पराभव”

ममता बॅनर्जी यांनीदेखील काँग्रेसवर टीकात्मक भाष्य केले आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना जागा दिल्या असत्या तर मतं फुटली नसती, असे त्या म्हणाल्या आहेत. “तेलंगणा राज्यात काँग्रेसचा विजय झाला आहे. ते मध्य प्रदेशमध्ये जिंकले असते. छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांतही त्यांचा विजय झाला असता. मात्र इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. ज्यामुळे मतं फुटली. हेच सत्य आहे. मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“या बैठकीबाबत काहीही माहिती नव्हते”

त्यांनी इंडिया आघाडीच्या ६ डिसेंबर रोजीच्या बैठकीवरही भाष्य केले. “६ डिसेंबर रोजी मी उत्तर बंगालला भेट देणार आहे. मला या बैठकीबाबत काहीही माहिती नव्हते. या बैठकीची तारीख मला अगोदरच सांगितली असती तर मी काही नियोजन करू शकले असते,” असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनात सर्व पक्ष एकत्र

दरम्यान, जागावाटपावरून इंडिया आघाडीत मतभेद दिसत असले तरी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र हे पक्ष एकत्र आहेत. विरोधक तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या निलंबनाविरोधात भूमिका घेणार आहेत. तसेच केंद्र सरकार लागू करू पाहात असलेल्या काही नव्या कायद्यांनाही विरोधक विरोध करणार आहेत.

Story img Loader