अकोला : राज्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला. गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पाच्या भक्तीसोबतच जनसंपर्क वाढविण्याची नामी संधीच राजकीय नेते व इच्छुकांना लाभली. गणेशोत्सवातील गर्दीला आकर्षित करण्याचे प्रयत्न नेते व इच्छुकांकडून सुरू आहेत. गौरी-गणपतीच्या सणात भेटीगाठीतून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. मतदारांना प्रभावित करण्यासाठी नेत्यांवर धार्मिक उत्सवाचे रंग चढल्याचे चित्र दिसून येते. निवडणुकीतील यशासाठी साकडे घालणाऱ्या इच्छुकांना गणराया पावणार का? अशी चर्चा सुरू आहे.
चातुर्मास हा सण व उत्सवांचा काळ. या चार महिन्यांमध्ये अनेक मोठे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. समाज एकत्रिकरणासाठी गणेशोत्सवाची तर मोठी पर्वणीच असते. त्याचा लाभ घेण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते व इच्छूक सरसावले आहेत. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रखडल्या आहेत. आता त्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला गती आली. त्यामुळे निवडणुकीची आस लावून बसलेल्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय मशागतीचा काळ असल्याने प्रमुख नेते मंडळींनी गौरी-गणपतीच्या ‘दर्शना’तून जनसामान्यांमध्ये मिसळण्यावर भर देत आहेत.
अकोला महापालिकेत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘अकोला पश्चिम’चा गड गमावल्यानंतर आता महापालिकेत वर्चस्व राखण्याचे आव्हान भाजप नेतृत्वापुढे राहील. त्यामुळे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रतोद आ.रणधीर सावरकर, खा.अनुप धोत्रे तळागाळातून पक्षाची वीण घट्ट करण्यावर भर देत आहेत. महापालिका क्षेत्रांतर्गत अकोला पूर्व भागात भाजपला भक्कम जनाधार आहे, ‘अकोला पश्चिम’मध्ये मात्र विधानसभेतील पराभवानंतर नव्याने गड उभारणी करण्याची कसरत नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेले भावी नगरसेवक देखील जनसंपर्कात भर घालण्यासाठी गणेशोत्सवाचा उपयोग करतांना दिसत आहेत. आपल्या प्रभागातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना ‘खुश’ ठेवण्यासाठी इच्छुकांनी सढळ हाताने ‘देणगी’ देऊन सर्वतोपरी मदतीची त्यांनी तयारी दर्शवली. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हे इच्छुकांचे लक्ष्य असते. त्यातच आलेला गणेशोत्सवाचा काळ जनसंपर्कासाठी सुवर्ण संधीच ठरतो. त्याचा लाभ करून घेण्यासाठी इच्छूक कामाला लागले आहेत.
इच्छुकांपुढे दुहेरी आव्हान
महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणुका होऊ घातल्याने इच्छुकांचा उत्साह दुणावला. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. प्रामुख्याने भाजपमध्ये तर उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ दिसून येते. कुणाला उमेदवारीची ‘लॉटरी’ लागणार व कुणाचा पत्ता कट होणार यावरून राजकीय चर्चा रंगात आहे. उमेदवारीसाठी पक्षांतर्गत तीव्र स्पर्धेचा सामना करण्यासोबतच निवडणुकीसाठी मतदारांमध्ये विश्वास वाढविण्याचे आव्हान इच्छुकांपुढे आहे.