दिगंबर शिंदे

पक्ष नेतृत्वाकडून होत असलेली उपेक्षा, सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडून होणारी कोंडी, निधी मिळण्यात होणारा दुजाभाव आणि या सर्व पार्श्वभूमीवर पक्षनेतृत्वाकडून सुरू असलेला विसंवाद यामुळे गेले अनेक दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पाचही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडाची दिशा पकडल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीतील गृह राज्य मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्यासह खानापूरचे अनिल बाबर, कोरेगावचे महेश शिंदे, सांगोल्याचे शहाजी बापू पाटील, गडहिंग्लजचे प्रकाश आबिटकर हे या बंडात सहभागी झाल्याचे समजते आहे. या सर्वच आमदारांशी आज सकाळपासून संपर्क तुटलेला आहे.

महायुतीच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराज देसाई (पाटण), अनिल बाबर (खानापूर), महेश शिंदे (कोरेगाव), शहाजी बापू पाटील (सांगोला) प्रकाश आबिटकर (गडहिंग्लज) हे शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. परंतु यातील बाबर, शिंदे आणि शहाजी पाटील हे तीन आमदार तसे मूळचे भाजपच्या संपर्कातील होते. परंतु जागा वाटपात हे मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांना नाईलाजास्तव ही निवडणूक शिवसेनेकडून लढवावी लागली होती. मात्र निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना शिवसेनेने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने हे आमदार सुरुवातीपासूनच मनाने या सरकारमध्ये सहभागी झालेले नव्हते.

दुसरीकडे या सर्व शिवसेनेच्या आमदारांची त्यांच्या मतदारसंघातील राजकीय स्थिती देखील या लोकप्रतिनिधींना अडचणीत आणणारी होती. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर या सरकारवर राष्ट्रवादीचेच मोठे वर्चस्व सुरुवातीपासून दिसून आले. या वर्चस्ववादातून आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचीच मोठी कोंडी होत होती. निधी न मिळणे, स्थानिक पातळीवर मतदारसंघात विरोधकांना कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडून बळ मिळणे, मुख्यमंत्री असलेल्या पक्ष नेतृत्वाला याबाबत सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यासाठी वेळ न मिळणे, संवाद न घडणे हे असे प्रकार वारंवार घडू लागल्याने हे सर्व आमदार अस्वस्थ होते. आघाडीतील मित्रपक्षांच्या कुरघोड्यांनी राजकीय अस्तित्वच धोक्यात येणार याची जाणीव त्यांना सतत सतावत होती. त्यातच सेनेच्या नेतृत्वाकडून संवादच घडत नव्हता. अडचणी, कामे स़ांगायची कोणाला आणि सोडवणार कोण असे प्रश्न उभे ठाकले. यातून खदखद वाढत गेली.

आपल्या वाट्याला येत असलेल्या उपेक्षेबाबत बाबर, शिंदे आणि शहाजी पाटील यांनी तर जाहीररीत्या अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली. हे सरकार आपले वाटत नसल्याचे वेळोवेळी बोलून दाखवले. मात्र या नाराजी नाट्यानंतरही शिवसेनेने आपल्या आमदारांच्या या अस्वस्थतेची दखल घेतली नाही. गेल्या महिन्यात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आटपाडीत पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व उपेक्षित आमदार एकत्र आले होते. त्यांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे व राज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर ही खदखद व्यक्त केली. आम्ही सरकारमध्ये आहोत, पण सरकार आमचे वाटत नाही असे स्पष्टपणे बाबर, पाटील यांनी सांगितले. यातूनच शिवसंवाद अभियानही पुढे आले. पण तोवर आमदार आणि पक्ष नेतृत्व यांच्यात मोठी दरी तयार झालेली होती. या अस्वस्थतेतूनच काल रात्री अखेर पश्चिम महाराष्ट्रातील या पाचही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडाची दिशा पकडल्याचे मानले जात आहे.