तृप्ती विकारी

मावळ तालुका हा खरेतर भाजपाचा बालेकिल्ला. या मतदारसंघात २५ वर्षे भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या परंपरेला छेद देत सुनील शेळके यांच्या रुपाने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. शेळके यांची पणजी, आजोबा, काका आणि चुलत भाऊ हे सर्वजण भाजपाचे नगरसेवक होते. मात्र, आई-वडिलांचा राजकारणाशी संबंध नाही. ते शेती काम करणारे. त्याअर्थाने कुटुंबात प्रत्यक्ष राजकीय वारसा नसलेले हे युवा नेतृत्व आहे.

आमदार होण्याच्या चार वर्षे अगोदर त्यांनी मावळ तालुक्यात भेटीगाठींचा झंझावात सुरू केला. तालुक्यातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्द त्यांनी दिला आणि आमदार झाल्यावर शब्द पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत तब्बल ७० हून अधिक पाणी योजनांची कामे सुरू केली. विशेष म्हणजे त्या विकास कामाचा शुभांरभ त्या-त्या भागातील महिलांच्या हातूनच केला. त्यामुळे मावळचे ‘जनसेवक’ या नावाने ते ओळखले जातात.

हेही वाचा: जयसिंग गिरासे : समाजभान असलेला कार्यकर्ता

शेळके हे शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे. प्रारंभीच्या काळात ते दोनदा भाजपकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे त्यांना २०१३ मध्ये नगरपरिदेचे विराेधी पक्षनेते म्हणून जबाबदारी देण्यात आली. २०१६ मध्ये ते भाजपकडून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती म्हणून काम पाहिले. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २०११ मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

हेही वाचा: दिव्या ढोले : कॉर्पोरेट क्षेत्रातून राजकारणाकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मावळ तालुक्यात पक्ष वाढीच्या कामासाठी फिरत असताना त्यांना तालुक्यातील अनेक गावांमधील समस्या भेडसावत होत्या. त्या समस्या राजकीय पटलावर सुटत नसल्याने त्यांनी तालुक्यातील काही गावे दत्तक घेऊन विकासाचे मॅाडेल सर्वांसमोर ठेवले. गावोगावी स्वखर्चाने विकासकामे सुरू केली. रस्ते, पाणी, गरजवंतांना घरे बांधून दिली. गावांमधील मंदिरे बांधण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. दहावीच्या मुलांसाठी परीक्षा काळात मोफत वाहन व्यवस्था केली. ती आज देखील कायम आहे. महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शिवण वर्ग व इतर व्यावसायिक प्रशिक्षण देणारे उपक्रम सुरू केले. फारसा राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ तालुक्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविली आहे.