सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : उमेवारी जाहीर करण्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करुन उद्घाटन केले. ही प्रक्रिया घडवून आणताना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी पून्हा एकदा खैरे- दानवे वाद चव्हाट्यावर आला. अद्यापि उमेदवारीचे निर्णय जाहीर झाला नाही. रविवारी रात्री उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे अद्यापि मी उमेदवारीची आशा सोडलेली नाही, रिंगणात आहे, असे अंबादास दानवे यांनी जाहीर केले. उद्धव ठाकरे गटात कुरघोडी सुरू असताना ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. मात्र, त्या सर्व अफवा असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या ऐनतोंडावर शिवसेनेतील दोन नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक भागात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे कार्यालय आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दानवे यांनी त्यांच्या कार्यालयावरील फलक बदलून त्यांचे कार्यालय ‘ मातृभूमी प्रतिष्ठान’ या नावाने ओळखले जाते. या कार्यालयात होणाऱ्या एकाही पत्रकार बैठकीस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हजेरी लावली नाही. त्यांना अनेकदा निमंत्रणही नसायचे. सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे असतील तरच हे दोन नेते मंचावर दिसत. एरवी त्यांच्या समर्थकांमध्ये कुरघोडी सुरूच असे. छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी आपल्यालाच असेल असा दावा करत चंद्रकांत खैरे यांनी मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचाही दावा ते करत होते.

आणखी वाचा- केवळ २३ दिवसांमुळेच अकोल्यात पोटनिवडणूक!

दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघातून अंबादास दानवे निवडणूक लढवतील, अशी चर्चा पेरण्यात आली. मात्र, लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातूनच आपणही निवडणूक लढविण्यास इच्छूक आहोत, असे दानवे यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी काही तास आगोदर स्पष्ट केले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील उमेदवारीचा बेबनाव पुढे आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारण नसताना नाहक शिवसेनेत चलबिचल निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे म्हणणे आहे. शिवसेनेतील उमेदवारीबाबत रविवारी संघ्याकाळपर्यंत निर्णय होऊ शकेल, असा दावा आता केला जात आहे. विधान परिषदे नेते अंबदास दानवे शिंदे गटात जाणार अशा बातम्या पसरल्यानंतर आपणही उमेदवारीच्या रिंगणात आहोत, असे अंबदास दानवे यांनी जाहीर केले आहे.