लातूर : एखाद्या मतदारसंघातील प्रचारगाडी रुळावर येते म्हणजे काय , असा प्रश्न विचाराल तर त्याचे उत्तर लातूरमध्ये सापडेल. कॉग्रेसचे नेते अमित देशमुख एरवी तसे शुभ्र कपड्यात वावरणारे. गाडीच्या खाली उतरले तर त्यांची बडदास्त ठेवणारे खूप. पण प्रचाराची गाडी रुळावर आली आणि अमित देशमुख आणि कॉग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी लातूरच्या गाव भागातील शेळके हॉटेलची पुरी भाजीही खाल्ली. दुसऱ्या दिवशी मग संभाजी पाटील निलंगेकरांनी उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या समवेत ‘ निलंगा राईस’ खाल्ला. प्रचाराची गाडी शेवटी रुळावर येते ते अशी, एवढीच प्रतिक्रिया सध्या मतदारसंघात आहे.

निवडणूक कोणत्याही उमेदवारास जमिनीवर पाय ठेवायला लावते म्हणतात. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षाचे उमेदवार व प्रचार प्रमुख गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. एरवी आपापल्या थाटात वावरणारे व फारसे लोकांच्या जवळपास न फिरकणारे मंडळीही निवडणुकीच्या काळात मतदारांना नमस्कार करत फिरत असतात. लातूरचे आमदार व विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे काँग्रेस पक्षाचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख. आपल्या मूळ गाव बाभळगावची गढी उतरून फारसे लोकात न मिसळणारे अमित देशमुख या निवडणुकीच्या निमित्ताने उन्हाचा तडाखा सहन करत थेट गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. टपरीवर चहा पिण्यापासून ते एखाद्या छोट्या दुकानातही ते बैठका घेत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने लातूरच्या काँग्रेस कार्यालयावर विजय संकल्पाची गुढी उभारल्यानंतर त्यांनी शहरातून संवाद फेरी काढली. लातूरच्या गाव भागातील शेळके हॉटेलची पुरी भाजीही खाल्ली. झणझणीत तिखट व मसालेदार पुरी भाजी यावर अमित देशमुख व उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी चांगलाच ताव मारला. उच्चभ्रू मंडळी अशा हॉटेलमध्ये फिरकतही नाहीत. त्यामुळे शेळके हॉटेलच्या पुरीभाजीचा भाव आता वधारला आहे.

हेही वाचा… भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?

दुसरीकडे भाजपचे प्रचार प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे दोघेही पायाला भिंगरी लावून फिरत आहेत .सुधारक शृंगारे हे आपल्याला फार भेटत नाहीत अशी ओरड विरोधक करत आहेत .निवडणुकीच्या काळात तेही फिरत आहेत. निलंगा येथील ‘निलंगा राईस’ हा अतिशय प्रसिद्ध आहे. संभाजी पाटील निलंगेकर हे लोकात मिसळणारे म्हणून त्यांची ओळख आहे. खासदारासोबत एकाच ताटात दोघांनी ‘निलंगा राईस’ खाल्ला. याची चर्चा आता मतदारसंघात जोर धरते आहे.