Amit Shahs Prediction For Tamil Nadu Polls २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीए तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी सरकार स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारवर टीका केली आणि भाजपा-एआयएडीएमके युती राज्यात सरकार स्थापन करेल असा दावा केला. तमिळनाडूच्या तिरुनेलवेली येथे एका सभेत बोलताना अमित शाह यांनी सत्ताधारी डीएमके आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांच्यावर राजकारणापेक्षा घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचा आरोप केला.
अमित शाह काय म्हणाले?
- अमित शाह म्हणाले की, एम. के. स्टॅलिन यांना त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना मुख्यमंत्री करायचे आहे आणि सोनिया गांधी यांना त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मला त्या दोघांनाही सांगायचे आहे की हे होणार नाही.”
- त्यांनी पुढे ठाम विश्वास व्यक्त करत म्हटले, ” यात दोघांनाही यश मिळणार नाही, कारण एनडीए विजयी होईल.”
- त्यांनी १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर आणखी टीका केली.
- या विधेयकावर टीका करण्याचा स्टॅलिन यांना कोणताही अधिकार नाही, कारण तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ‘काळे काम’ केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

शाह यांनी आरोप केला की, डीएमकेने देशातील सर्वात भ्रष्ट सरकार चालवले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तमिळ शास्त्रीय ग्रंथ ‘थिरुक्कुरल’च्या आदर्श अन् सक्षम शासनाच्या मार्गदर्शनानुसार सरकार चालवले आहे. “मोदीजींनी लोकसभेत १३० वे घटनादुरुस्ती विधेयक सादर केले आहे. संपूर्ण विरोधी पक्षाने विरोध सुरू केला. घटना विधेयक काय आहे? जर कोणताही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तुरुंगात गेला, तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. विरोधी पक्ष विचारत आहेत, या विधेयकाची काय गरज आहे?” त्यांनी डीएमके नेते आणि माजी मंत्री के. पोन्मुडी यांच्यावरील खटल्याचा आणि ईडीच्या प्रकरणात तुरुंगात असतानाही मंत्री म्हणून कार्यरत असलेले व्ही. सेंथिल बालाजी यांच्या अलीकडील प्रकरणाचा उल्लेख केला.
तुरुंगात असूनही मंत्रिमंडळाचा भाग राहून सरकार चालवणे योग्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. “डीएमकेचे ज्येष्ठ मंत्री के. पोन्मुडी आणि सेंथिल बालाजी आठ महिने तुरुंगात होते. त्यांनी राजीनामा दिला नाही. मला सांगा, तुम्ही तुरुंगात असताना सरकार चालवू शकता का? हे डीएमकेचे लोक १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाला काळे विधेयक म्हणतात. स्टॅलिन बाबू, हे विधेयक काळे विधेयक म्हणण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, कारण तुम्ही असे मुख्यमंत्री आहात, जे ‘काळे काम’ करतात,” असे शाह म्हणाले.
भाजपा-एआयएडीएमके युतीची रणनीती
दोन वर्षांनंतर, भाजपा आणि एआयएडीएमकेने पुढील वर्षी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती केली आहे. २०२१ च्या तमिळनाडू निवडणुकीत भाजपा आणि एआयएडीएमकेने एकत्र निवडणूक लढवली होती, तेव्हा पलानीस्वामी मुख्यमंत्री होते. परंतु, एनडीएला डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून पराभव पत्करावा लागला. एनडीएला २३४ जागांपैकी केवळ ७५ जागा जिंकता आल्या. एआयएडीएमकेने ६६ जागा जिंकल्या, तर भाजपाला केवळ चार जागा जिंकता आल्या. दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र, एआयएडीएमकेला तमिळनाडूमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपाच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे.