सिद्धेश्वर डुकरे
गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत ताकद निर्माण करता आली नव्हती. आमदार किंवा नगरसेवकांची संख्या मर्यादित राहिली. पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटाने समीर भुजबळ तर शरद पवार गटाने राखी जाधव यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादीची जबाबदारी सोपविली आहे. या दोघांमध्ये कोण बाजी मारते याची आता उत्सुकता असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याचा फेसला होईल तेव्हा होईल मात्र दोन्ही गटाच्या मुंबई अध्यक्षांना आपला करिष्मा करून दाखवावा लागेल.पक्ष विस्तारावर भर देत आपापल्या गटाची ताकद दिवसेंदिवस कशी वाढेल यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

हेही वाचा… कर्नाटक आणि हिमाचलच्या निर्णय प्रक्रियेमुळे तेलंगणातील मतदारांमध्ये काँग्रेसबद्दलचा विश्वास वाढला, पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे निरीक्षण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईतील सभेत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा राखी जाधव यांची पक्षाच्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांची तब्बल १७ महिन्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने कारावासातून सूटका केली. या काळात मुंबई अध्यक्षपद रिक्त होते.

पक्ष स्थापनेपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले बस्तान नीट बसवता आले नाही. मुंबई महापालिका निवडणूक असो की विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईत आपले पाळेमुळे बळकट करता आली नाहीत.यातच अजित पवार यांनी पक्षात बंड केल्याने मुंबईत पक्षाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी अध्यक्ष राखी जाधव यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा… मोफत देवदर्शन सहलीतून नगरमधील नेत्यांचे राजकीय ‘पुण्यसंचय’

नवाब मलिक हा पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा आहेत. तुरूंगातून जामिनवर मलिक आले असले तरी त्यांना काही अटी घातलेल्या असल्याने त्यांनी अलिप्त राहणे पसंत केले आहे. राखी जाधव यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. त्यांनी प्रभाग प्रमुख, जिल्हानिहाय,तालुका स्तरावरील पदाधिकार्यांच्या नेमणूका करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय अजित पवार गटात जाणारे पदाधिकारी,कार्यकर्ते यांना वेसण घालावी लागणार आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असली तरी समोर मोठे आव्हान आहे.

अजित पवार गटाने माजी खासदार समीर भुजबळ यांचे पुनर्वसन करताना त्यांच्या खांद्यावर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांना काका छगन भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेत असताना मुंबईतून झाली.मोठ्या भुजबळांना मुंबईची नस माहित आहे.त्यांचे मार्गदर्शन समीर भुजबळ यांना लाभणार आहे.

हेही वाचा… मनसेचे पुण्याकडे अधिक लक्ष, लोकसभा लढण्याची तयारी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार गटाला मुंबईत पाय रोवून जम बसवण्याचे मोठे आव्हान समीर भुजबळ यांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी त्यांना पक्ष विस्तार करताना दोन हात करावे लागणार आहेत. मुंबईत दोन्ही गटात रस्सीखेच राहणार आहे. समीर भुजबळ यांच्याकडे सत्तेचे कवच आहे तर राखी जाधव यांच्याकडे स्थानिक कार्यकर्ता म्हणून ताकद आहे. त्या मुंबई महापालिकेत नगरसेवक होत्या. समीर भुजबळ किंवा राखी जाधव या दोघांसमोर आव्हान मोठे आहे.